शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार आणि राष्ट्रवादीच्या आमदाराची चौकशी,जाणून घ्या नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 10:17 AM • 03 Apr 2022

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी आणि अन्य केंद्रीय तपासयंत्रणाकडून होत असलेल्या कारवाईवरुन राज्यात रणकंदन सुरु आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष ईडी कारवाईवरुन केंद्रातील भाजप सरकारवर थेट निशाणा साधत आहेत. राज्यात अशी परिस्थिती असली तरीही सोलापुरात सत्तेतील शिवसेना नेत्याने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माढ्याचे आमदार बबन शिंदे ईडीच्या रडारवर आले आहेत. आमदार बबन शिंदे आणि […]

Mumbaitak
follow google news

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी आणि अन्य केंद्रीय तपासयंत्रणाकडून होत असलेल्या कारवाईवरुन राज्यात रणकंदन सुरु आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष ईडी कारवाईवरुन केंद्रातील भाजप सरकारवर थेट निशाणा साधत आहेत. राज्यात अशी परिस्थिती असली तरीही सोलापुरात सत्तेतील शिवसेना नेत्याने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माढ्याचे आमदार बबन शिंदे ईडीच्या रडारवर आले आहेत.

हे वाचलं का?

आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांची आज ईडीच्या पथकाने पाच तास चौकशी केल्याचं कळतंय. रणजितसिंह शिंदे यांची नुकतीच सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदावर निवड झाली आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्याच्या प्रकरणात ईडीने आज शिंदे पिता-पुत्राची चौकशी केल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर बेबनाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

माढा तालुक्यातील नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्याविरुद्ध एका सूतगिरणी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार ईडी, सेबी आणि आयकर विभागाकडे केली होती. यानंतर संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्या साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे कोकाटे यांनी केवळ तक्रार करुन न थांबता त्याचा पाठपुरावाही केल्यामुळे ईडीने आज सोलापुरात शिंदे पिता-पुत्रांची चौकशी केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भविष्यकाळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून आमदार शिंदे यांनी जवळपास ५०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी केला होता. दरम्यान आमदार शिंदे यांनी ईडीच्या या चौकशीवर काहीही बोलण्यास नकार दिला.

दरम्यान संजय शिंदेविरुद्ध दंड थोपटणाऱ्या कोकाटे यांनी या प्रकरणातील चौकशीचं स्वागत करत भगवान के घर मे देर है अंधेर नही असं म्हटलं आहे. “विरोधकांवर खोट्या केस करायच्या, त्यांना बदनाम करायचं आणि स्वतः चोऱ्या करुन धर्मात्मा बनायचं हे आता संपलेलं आहे. जनतेच्या जादा उसाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या धंद्यासाठी त्याचा वापर करायचा, शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन कर्ज उचलायचं. मग ही घेतलेली कर्ज कर्जमाफीच्या प्रक्रियेत बसवायची अशा प्रकारचा भ्रष्टाचार बबन शिंदे आणि रणजित शिंदे यांनी केला आहे. यावर आता न्याय होणार आहे. प्रसंग आला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयातपर्यंत जाऊ पण शेतकऱ्यांचा जो पैसा आहे तो त्यांना परत देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करु. शिंदे पिता-पुत्रांना आतापर्यंत तीन नोटीसा बजावण्यात आल्या असून चौथ्या नोटीसीनंतर त्यांना अटकही होऊ शकते”, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.

    follow whatsapp