– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी
ADVERTISEMENT
संतोष परब हल्ला प्रकरणात जामिनासाठी धावपळ करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंच्या पदरी आज पुन्हा एकदा निराशा पडली. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राणेंना अटकेपासून १० दिवस संरक्षण दिलेलं असलं तरीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यानंतर शिवसेना नेत्यांनी राणेंवर पुन्हा एकदा आपला निशाण साधला आहे.
नितेश राणे यांनी पोलिसांना शरण जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली द्यावी असा सल्ला खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
सुप्रीम कोर्टाचा नितेश राणेंना दणका, अटकपूर्व जामीन नाकारल्याने वाढल्या अडचणी
नितेश राणेंनी आता पोलिसांना शरण जाऊन आपल्या गुन्ह्याची कबूली द्यावी, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना हेच सांगेन. अशा प्रकारे कायद्यापासून पळवाटा काढण्यापेक्षा नितेश राणेंनी कायद्याला शरण जाऊन गुन्ह्याची कबुली द्यावी अशी मागणी राऊत यांनी केली. ते आज रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे बोलत होते.
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनीही आजच्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना, नितेश राणेंना आता अटक अटळ आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे. “ही सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू मान्य केली. सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं असेल की या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा हात आहे, म्हणून जामीन फेटाळला असेल. त्याची पूर्ण रिझिनिंग ऑर्डर मी बघितलेली नाही, परंतु जामीन फेटाळला आहे त्यामुळे आता अटक अटळ आहे.”
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असला तरीही भाजप नेते अद्याप आशावादी आहेत. माजी खासदार आणि नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी आज गुहागरमध्ये बोलत असताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा एकाप्रकारे दिलासा असल्याचं म्हटलं आहे.
आम्हाला एकाप्रकारे हा दिलासाच आहे. दहा दिवस आम्हाला रिलीफ देण्यात आला असून ट्रायल कोर्टात जाण्यास सांगितलं आहे. त्यानुसार आम्ही ट्रायल कोर्टात जाऊ, याचा अर्थ जामिन फेटाळला असा होत नाही. नितेश राणे यांना जर आजच्या आज हजर रहायला सांगितलं असलं तर त्याचा अर्थ जामिन फेटाळला असा होतो अशी प्रतिक्रीया निलेश राणे यांनी दिली.
ADVERTISEMENT
