२१ जूनला महाराष्ट्रातलं सर्वात बंड झालं. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं. महाराष्ट्रातलं सरकार अल्पमतात आलं, त्यानंतर ते पडलंही. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
ADVERTISEMENT
रविवार-सोमवार हे दोन दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं. या अधिवेशनात भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यात यावं यासंदर्भातला व्हीप एकनाथ शिंदे यांनी बजावला होता. तर ठाकरे गटाने राजन साळवींना मत द्यावं यासाठी व्हीप बजावला होता. आता एकनाथ शिंदे यांनी बजावलेला व्हीप पाळला नाही म्हणून ठाकरे गटातल्या १६ आमदरांना नोटीस बजावल्या जातील याची शक्यता आहे. असं घडलं तर आदित्य ठाकरेंनाही नोटीस बजावली जाईल.
विधानसभा अध्यक्षांची निवड करताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला होता. ठाकरे गटातील १६ आमदारांनी नार्वेकर यांना मतदान केलं नाही असं उघड झालं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या तक्रारीवरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या १६ आमदारांना नोटिसा बजावण्याची शक्यता आहे. नोटीस बजावल्यानंतरही या १६ आमदारांनी उद्या शिंदे यांच्या बाजूने मतदान केलं नाही तर त्यांच्यावर अपात्रता ठरवण्यासंदर्भातील कारवाई सुरू करण्यात येईल.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३९ शिवसेना आमदार आहेत. दोन तृतीयांश बहुमत शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे आता येत्या काळात शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट यांच्यात वाद रंगण्याची सुरूवात होणार आहे हे नक्की आहे. शिवसेनेच्या बंड केलेल्या १६ आमदरांचं सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी यासंदर्भात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी ११ जुलैला सुनावणी होणार आहे. अशात आता सोमवारी फ्लोअर टेस्ट होणार आहे. यावेळीही जर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या व्हीप प्रमाणे मतदान केलं नाही तर त्यांना नोटीसा येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास संघर्षाची पहिली ठिणगी पडून तो पुढे आणखी तीव्र होईल यात शंका नाही.
ADVERTISEMENT
