delhi dwarka accident : दिल्लीतील द्वारका परिसरात 3 फेब्रुवारी रोजी भीषण अपघातात एका 23 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागलाय. रील बनवण्याच्या नादात भरधाव स्कॉर्पिओ चालवणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गाडीने 23 वर्षीय साहिल धनेशरा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात साहिल यांचा जागीच मृत्यू झाला असून एका कॅब चालकाला गंभीर दुखापत झाली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल 3 फेब्रुवारी रोजी दुपारी आपल्या कार्यालयाकडे जात होते. त्याच वेळी दुसऱ्या लेनमधून येणारी (UP57BM3057) क्रमांकाची स्कॉर्पिओ स्टंट करत भरधाव वेगात त्यांच्या दुचाकीसमोर आली आणि समोरासमोर धडक झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतरही चालकाने ब्रेक लावले नाहीत. या अपघातात रस्त्याच्या कडेला असलेला एक कॅब चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
साहिल यांची आई इन्ना माकन या एकल पालक आहेत. त्यांनी धाय मोकलून रडत असताना सांगितले की, “साहिल हा माझा एकमेव आधार होता. 23 वर्षे मी त्याला एकटीने वाढवले. मोठ्या कष्टाने त्याला सक्षम बनवले. पण एका क्षणात माझं सर्वस्व हिरावलं गेलं.” त्यांच्या मते, हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक केलेली गुन्हेगारी कृती आहे.
इन्ना माकन यांनी आरोप केला की, अपघाताच्या वेळी आरोपी मुलगा आपल्या बहिणीसोबत रील शूट करत होता. संबंधित रीलमध्ये गाडीचा वेग स्पष्ट दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सार्वजनिक रस्त्यावर स्टंट करत रील बनवणे म्हणजे इतरांच्या जीवाशी खेळणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चालकाकडे वैध परवाना नव्हता, हेही तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सांगितले की आरोपीचे वय 17 वर्षे आहे. सुरुवातीला एफआयआरमध्ये त्याचे वय 19 वर्षे नमूद करण्यात आले होते. मात्र, नंतर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन किशोर न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. आरोपीच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मोटार वाहन कायद्यानुसार (एमव्ही अॅक्ट) दोषारोपपत्रात वडिलांचे नाव समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार, साहिल यांचा मृत्यू ‘हेमोरॅजिक शॉक’मुळे झाला. मेंदूला झालेली गंभीर दुखापत (क्रेनिओ-सेरेब्रल इजा), उजव्या हातासह महत्त्वाच्या अवयवांना झालेल्या जखमा आणि अपघाताचा तीव्र आघात ही मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जखमांचे स्वरूप रस्ते अपघाताशी सुसंगत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिल्ली पोलीस मार्फत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू ठेवला आहे. दरम्यान, आरोपी कुटुंब धनिक असल्याच्या चर्चांदरम्यान इन्ना माकन यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. “जर रस्त्यावरच विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर कोण सुरक्षित आहे?” असा सवाल करत त्यांनी आपल्या मुलासाठी न्याय देण्याचे आवाहन केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











