मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, म्हणाले….

मुंबई तक

• 08:20 AM • 13 Jan 2022

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटने दुकानांवरच्या पाट्या मराठीतच असाव्यात यासंदर्भातल्या कायद्यात दुरूस्ती केली. दुकानांवरच्या पाट्या मराठीत आणि मोठ्या ठळक अक्षरात असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे कोणतीही सबब देऊन दुसऱ्या भाषेतली पाटी लावता येणार नाही. इंग्रजी फलक असेल तर त्यातल्या इंग्रजी अक्षरांपेक्षा मोठं मराठी नाव असलं पाहिजे असा हा बदल आहे. या बदलाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता मनसे […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटने दुकानांवरच्या पाट्या मराठीतच असाव्यात यासंदर्भातल्या कायद्यात दुरूस्ती केली. दुकानांवरच्या पाट्या मराठीत आणि मोठ्या ठळक अक्षरात असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे कोणतीही सबब देऊन दुसऱ्या भाषेतली पाटी लावता येणार नाही. इंग्रजी फलक असेल तर त्यातल्या इंग्रजी अक्षरांपेक्षा मोठं मराठी नाव असलं पाहिजे असा हा बदल आहे. या बदलाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं आहे.

हे वाचलं का?

कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान मराठी भाषेसाठी आग्रह धरत आंदोलनं करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून हे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हटलंय राज ठाकरेंनी पत्रात?

या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येईल.

मराठी भाषेत पाटय़ा असाव्यात, असा नियम असला तरी अनेक दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करतात. मराठी पाटय़ांसाठी दहा वर्षांपूर्वी मनसेने आंदोलन केले होते. मनसेच्या इशाऱ्यानंतर सर्वत्र मराठी पाटय़ा झाल्या होत्या. पंरतु, अलीकडे पुन्हा मराठीला डावलून फक्त इंग्रजीमध्ये पाटय़ा लावण्याचे प्रकार वाढले होते. मराठी पाटय़ांची सरकारने सक्ती केल्याने सर्व पाटय़ा मराठीत होतील, अशी अपेक्षा आहे. तमिळनाडू वा कर्नाटकात त्या त्या भाषांमध्येच पाटय़ा लावणे सक्तीचे असून, कोणी तमीळ किंवा कन्नड भाषांना डावलण्याची हिंमतही करू शकत नाही. राज्यात व विशेषत मुंबई, ठाण्यात मराठीला डावलून इंग्रजीमध्ये पाटय़ा लावण्याचे प्रकार अलीकडे वाढले होते. मराठी पाटय़ांसाठी सरकार किती ठाम राहते यावरच या निर्णयाची अंमलबजावणी अवलंबून असेल.

    follow whatsapp