पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होतं आहे. बंगालच्या ३०, आसाममध्ये ३९ जागांसाठी हे मतदान होतं आहे. गुरूवारी सकाळपासूनही वेगवेगळ्या भागांमधून हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.
ADVERTISEMENT
नंदीग्राममध्ये आता ममता बॅनर्जीही व्हील चेअरवर बसून पोहचल्या आहेत. इथल्या मतदान केंद्रांचा त्या जातीने आढावा घेत आहेत. दुपारी २ च्या सुमारास ममता बॅनर्जी या ठिकाणी पोहचल्या. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला होता की आम्हाला या ठिकाणी मत दिलं जाऊ देत नाही, अडवलं जातं आहे. ममता बॅनर्जी यांनी या ठिकाणी पोहचून सामान्य जनतेची मतं जाणून घेतली. मतदान केंद्रांवर असलेले अधिकारी हे अडचणी वाढवत आहेत असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बाहेरून आलेले लोक हे मतदारांना मतदान केंद्रांवर जाऊ देत नाहीत असा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. या सगळ्या गोंधळ आणि गदारोळाविरोधात ममता बॅनर्जींनीच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये निःपक्षपातीपणे निवडणूक घेण्यात यावी असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. त्यांनी या ठिकाणाहून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनाही फोन केला.
पश्चिम बंगालमध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झालं आहे. तर आसाममध्ये ४८ टक्के मतदान झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधल्या मतदान केंद्रांचा आढावा घेतला आणि पाहणी केली. आता त्यांनी जिथे गदारोळ झाला त्याच ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर ठिय्या दिला आहे.
ADVERTISEMENT
