देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर जात आहेत असं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. तरीही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत.
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत २६ टक्के कमी झाले आहेत. तरीही देशात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढत आहेत २२ मार्च ते २९ मार्च या आठ दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातवेळा वाढले आहेत. पेट्रोल प्रति लिटर ८० पैसे तर डिझेल प्रति लिटर ७० पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत पेट्रोल प्रति लिटर १०० रूपयांच्याही पुढे गेलं आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर १००.२१ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे तर डिझेलचा दर ९१.४७ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. सोमवारीच देशातल्या तेल कंपन्यांनी लिटर मागे ३० आणि ३५ पैसे अशी वाढ केली होती. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
मुंबईत आज पेट्रोलचा दर ११५.०४ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलची किंमत ९९.२५ रूपये प्रति लिटर इतकी झाली आहे. आता मुंबईत डिझेलही शंभरी पार करण्याच्या तयारीत आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल १०० ते ११६ रूपये लिटर अशा दराने विकलं जातं आहे.
देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल १००.२१ रूपये प्रति लिटर आहे, तर डिझेल ९१.४७ रूपये लिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल ११५.०४ रूपये लिटर इतकं झालं आहे तर डिझेल ९९.२५ रूपये लिटर झालं आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०९.६८ रूपये लिटर झालं आहे तर डिझेल ९४.६२ रूपये लिटर झालं आहे. चेन्नईत पेट्रोल १०५.९४ रूपये लिटर झालं आहे तर डिझेल ९६ रूपये लिटर झालं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती १३० रूपये प्रति बॅरलवरून १०३ रूपये प्रति बॅरलवर घसरल्या आहेत. तरीही राष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढले आहेत. याबाबतीतल्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की अद्याप ही दरवाढ थांबेल अशीही चिन्हं नाहीत. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही काळात आणखी वाढणार आहेत यात शंका नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या ज्या किंमती असतात त्या आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज ठरवल्या जातात. ऑईल कंपन्या क्रूड ऑईलच्या किंमती पाहून दररोज आपले दर ठरवतात. रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेल यांचे दर तेल कंपन्या जाहीर करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या रोज त्यांच्या किंमती जाहीर करतात.
ADVERTISEMENT
