गळ्यात किलोभर सोनं, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी आणि बैलगाडा. नवी मुंबईच्या, कल्याण डोंबिवलीच्या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटलं की पंढरीशेठ फडके यांचं नाव येतंच!
ADVERTISEMENT
अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून १३ नोव्हेंबरला पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण ३२ जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला 2 बैलगाडा मालकांमध्ये हा वाद झाला असे त्याचे स्वरुप होतं. पण पोलीस तपासात या गोळीबारामागे कल्याण-डोंबिवलीमधील राजकारण समोर आलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?
राज्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करायच्या यासंदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती. पंढरी फडके आणि राहुल पाटील या बैठकीसाठी निघालेले असताना अंबरनाथजवळ दोन्ही गट एकमेकांसमोर येताच, त्यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून पंढरी फडके याचा चालक एकनाथ फडके याने आपल्याकडील बंदुकीतून राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
नंतर राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पंढरी फडके विरोधात गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री विहेगर गावातून पंढरी फडके, एकनाथ फडके आणि हरिशचंद्र फडके या तीन आरोपींना अटक करत त्यांचे रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांनी तपास सुरु केल्यानंतर आता या घटनेमागचे राजकारण समोर यायला सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिंवली महापालिकेत कुणाल पाटील हे अपक्ष नगरसेवक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्या वॉर्डातून कुणाल पाटील निवडणुक लढवण्यास उत्सुक आहेत, त्याच वॉर्डातून राहुल पाटील हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. राहुल पाटील यांनी काही दिवसांपुर्वीच बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे कुणाल पाटील विरुद्ध राहुल पाटील यांच्यातल्या वादाला राजकारणाची किनार आहे.
दुसरीकडे राजकारण आहे ते बैलगाडा शर्यतीचे. पंढरीनाथ फडकेंच्या आजोबापासून बैलगाडा शर्यतीचा शौक त्यांच्या घरात केला जातो. महाराष्ट्रभर ज्या बैलगाडा शर्यती होतात त्यातल्या जिंकणाऱ्या बैलांना विकत घेऊन सांभाळण्य़ाचा काम पंढरीनाथ फडके करतात.
राहुल पाटील यांच्याकडे असणारा मथूर बैल यांने पंढरीनाथ फ़डकेंच्या बैलांना गेल्या काही दिवसात सातत्याने अस्मान दाखवले आहे. त्यामुळे पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्यातूनच फडके आणि पाटील यांच्यातल्या बाचाबाचीचे रुपांतर गोळीबारात झाले.
या प्रकरणातली तिसरी बाजू म्हणजे कुणाल पाटील-पंढरीनाथ फडकेंची मैत्री. या मैत्रीखातर0 पंढरीनाथ फडकेंनी “तुला जिवे ठार मारून, आज तुझं मयत इथेच टाकणार, मग तू निवडणुकीला कसा निवडून येशील?”, असं म्हणत राहुल पाटील आणि त्यांच्या साथीदारांच्या दिशेने पिस्तूल, रिवॉल्व्हर, डबल बोअर बंदूकीतून गोळीबार केला असा आरोप केला जात आहे.
ADVERTISEMENT
