काँग्रेस म्हणजे काय मुघल सल्तनत आहे का? पृथ्वीराज चव्हाणांचा उद्विग्न सवाल

मुंबई तक

• 03:09 PM • 26 Aug 2022

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस पक्षातील राजीनाम्यानंतर काँग्रेसमधूनच दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी आझाद यांच्यावर टीका करताना ज्यांना काँग्रेस पक्षाने सगळे दिले ज्यांना गांधी परिवाराने सगळे दिले तेच आता तक्रार करत आहेत, पक्ष सोडून चालले आहेत. हे काही बरोबर नाही. असे म्हंटले आहे. […]

Mumbaitak
follow google news

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस पक्षातील राजीनाम्यानंतर काँग्रेसमधूनच दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी आझाद यांच्यावर टीका करताना ज्यांना काँग्रेस पक्षाने सगळे दिले ज्यांना गांधी परिवाराने सगळे दिले तेच आता तक्रार करत आहेत, पक्ष सोडून चालले आहेत. हे काही बरोबर नाही. असे म्हंटले आहे. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र गांधी कुटुंबियांनी दिले याचा अर्थ काँग्रेस म्हणजे काय मुघल सल्तनत आहे का? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

‘मुंबई तक’ ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही मानसिकता महत्वाची आहे, आणि त्याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. गांधी कुटुंबियांनी दिले म्हणजे ही काय वैयक्तिक मालकीची गोष्ट आहे का? हा एक लोकशाही मार्गाने चालणारा राजकीय पक्ष आहे. त्याची घटना आहे, पक्षाची नोंदणी करताना निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी केली आहे. आता हा पक्ष त्या घटनेप्रमाणे चालणार आहे का? त्या घटनेमधील तरतुदींप्रमाणे चालणार आहे का? की गांधी कुटुंबियांनी दिले आणि आता तुम्ही समाधान मानले पाहिजे, असे काही आहे का? दिले म्हणजे काय? मुघल बादशाहीतील ही मुघल सल्तनत आहे का?

काँग्रेसच्या सात आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला क्रॉस व्होटिंग केलं, पृथ्वीबाबांचा गौप्यस्फोट

लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत. सगळ्या नेमणुका होत आहेत, त्यामुळे तुम्ही असं म्हणतं आहात. तुमची नेमणूक केली म्हणजे तुम्ही खूश झाले पाहिजे. अरे नेमणुका का करता? तुम्ही निवडणुका का घेत नाहीत? गेल्या 24 वर्षांमध्ये पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत, याचा कुठेतरी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? असा सवालही त्यांनी विचारला.

चव्हाण पुढे म्हणाले, आता यात आमची सर्वांचीच चूक आहे. आम्ही आताच का आवाज काढला? दोन वर्षामध्ये का बोललो नाही? जुन्या पद्धतीमुळे जोपर्यंत सोनिया गांधी होत्या, तोपर्यंत आम्हाला विजय मिळत होता. आम्ही 10 वर्ष सत्तेत होतो पण आमची चूक आहे, आम्ही त्यावेळी बोलायला पाहिजे होते की शेवटच्या निवडणुका सीताराम केसरी यांनी कलकत्तामध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर तब्बल 24 वर्ष निवडणूक झालेली नाही. त्यामुळे हे असं बोललं जातं आहे की दिले तुम्हाला. अरे कोण देणार तुम्ही? आणि दिले म्हणजे काय? ही मुघल बादशाहीतील ही मुघल सल्तनत आहे का? आम्ही दिले आणि तुम्ही आता खूश झाले पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची फिल्डिंग…

सगळे 18 वर्षांची मुलं निवडून आले तरी आम्हाला काही हरकत नाही. पण लोकशाही पद्धतीने येवू द्या. किंवा गुलाब नबी आझाद यांचे 70 वर्षांचे वय झाले असले तरी ते निवडून आले तरी त्यांना मान्य करायला हवे. तुम्ही हे 50 वर्षांच्या आतील, 40 वर्षांच्या आतील अशी कृत्रिम वाटणी करत आहात. तुम्ही ठरवंत आहात कोणाला करायचे कोणाला नाही. मनाने तुम्ही निर्णय घेत आहात की एका कुटुंबातील जास्त नकोत. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत? मला वाटतं असं करणं योग्य नाही. तु-तु मी-मी करण्याला काय अर्थ नाही. आमची एकच मागणी आहे की काँग्रेस पक्षाला वाचवायचे असेल तर लोकशाही पद्धतीने ती सगळी पद भरली गेली पाहिजेत. नियुक्तीची संस्कृती थांबली पाहिजे, अशी अपेक्षाही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp