छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडलेल्या एका थरारक हत्येचा छडा अखेर पोलिसांनी लावला आहे. मूकबधीर सासऱ्याची क्रूरपणे हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून गोदावरी नदीच्या पात्रात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कारागृहातील एका कैद्याला मृतदेहाचा फोटो दाखवताच या बेवारस मृतदेहाची ओळख पटली आणि संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
ADVERTISEMENT
पैठण तालुक्यातील पाटेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात चार दिवसांपूर्वी एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. पोत्यात गुंडाळलेला हा मृतदेह दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्या झाल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. मृतदेह बेवारस असल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक सक्रिय करण्यात आले.
तपासादरम्यान परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्यात आल्या. तसेच आजूबाजूच्या गावांत चौकशी सुरू होती. दोन दिवसांच्या मेहनतीनंतर हा मृतदेह गदेवाडी येथील कृष्णा पंढरीनाथ धनवडे (वय 38) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. कृष्णा हे मूकबधीर होते. ते अनेकदा घरातून निघून जात असत आणि दीर्घकाळाने परतत असत. मोबाईल फोन नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ताची तक्रारही दिली नव्हती.
हेही वाचा : कोल्हापूर : पोटच्या पोराने आई-वडिलांना क्रूरपणे संपवलं, हाताच्या नसा कापल्या, काठीने बेदम मारलं
तपासात पुढे धक्कादायक माहिती समोर आली. कृष्णा हे दारूच्या नशेत आई-वडील, मूकबधीर बहिण आणि बाळंतपणासाठी घरी आलेल्या भाचीला मारहाण करत असल्याचे उघड झाले. या सततच्या त्रासामुळे घरात तणावाचे वातावरण होते. या वादातूनच कृष्णाच्या भाचे-जावई सागर रामेश्वर केसापुरे (वय 20, रा. देऊळगाव राजा) याच्यावर संशय बळावला.
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक पतन इंगळे आणि उपनिरीक्षक महेश घुगे यांचे पथक मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पैठण परिसरात तळ ठोकून होते. तपासादरम्यान ते शेवगाव पोलिस ठाण्यात गेले असता, अंमलदार बलवीरसिंग बहुरे यांनी समयसूचकता दाखवत जवळील कारागृहातील काही कैद्यांना मृतदेहाचे छायाचित्र दाखवले. त्यापैकी एका कैद्याने मृत व्यक्ती कृष्णा असल्याची माहिती दिली. यामुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
यानंतर पोलिसांनी देऊळगाव राजा येथे जाऊन सागर केसापुरे याला ताब्यात घेतले. चौकशीत सागरने गुन्ह्याची कबुली दिली. 15 डिसेंबरच्या रात्री तो सासरी गेला असता, झोपेत असलेल्या कृष्णाची मित्र ऋषिकेश गायकवाड (वय 22, रा. दुधड) आणि एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून गोदावरी नदीत टाकण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह अल्पवयीनाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून घडलेले हे हत्याकांड संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारे ठरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











