नागपूर : वृद्ध डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून 2 कोटी उकळण्याचा प्रयत्न, युट्यूब पत्रकार मुख्य आरोपी, 11 जणांना अटक

Nagpur Crime : डॉक्टर मानसिक दबावाखाली असल्याने सुरुवातीला त्यांनी आरोपींना 1 लाख 68 हजार रुपये दिले. मात्र, आरोपींच्या खंडणीच्या मागणीत सातत्याने वाढ होत होती. अखेर दोन कोटींच्या मागणीपैकी 60 लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Nagpur Crime

Nagpur Crime

योगेश पांडे

20 Dec 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 09:37 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : वृद्ध डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून 2 कोटी उकळले,

point

युट्यूब पत्रकारासह 7 पुरुष अन् 4 महिलांना अटक

Nagpur Crime : नागपूर शहरात हनीट्रॅपच्या माध्यमातून एका 62 वर्षीय नामांकित डॉक्टरला अडकवून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेच्या घरफोडीविरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात सात पुरुष आणि चार महिलांना अटक करण्यात आली असून, विशेष म्हणजे या टोळीचा मुख्य सूत्रधार हा नागपूरमधील एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचा पत्रकार असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने सुनियोजित पद्धतीने डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवले. काही महिलांच्या माध्यमातून डॉक्टरशी संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर आरोपींनी डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वारंवार धमकी देत आरोपींनी थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टर मानसिक दबावाखाली असल्याने सुरुवातीला त्यांनी आरोपींना 1 लाख 68 हजार रुपये दिले. मात्र, आरोपींच्या खंडणीच्या मागणीत सातत्याने वाढ होत होती. अखेर दोन कोटींच्या मागणीपैकी 60 लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फसवणूक झाल्याची तीव्र जाणीव झाल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतली.

तक्रार मिळताच गुन्हे शाखेच्या घरफोडीविरोधी पथकाने तात्काळ तपास सुरू करत सापळा रचला. खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविकांत कांबळे (मुख्य आरोपी), अश्विन धनविजय, कुणाल पुरी, रितेश दुरुगकर, आशिष कावडे, अविनाश साखरे, नितीन कांबळे यांच्यासह चार महिलांचा समावेश आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी रविकांत कांबळे हा पत्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो नागपूरमधील एका नामांकित यूट्यूब चॅनलशी संबंधित आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीही रविकांत कांबळे याने गडचिरोली जिल्ह्यातील बांधकाम विभागातील एका अभियंत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटून पुन्हा त्याने अशाच प्रकारचे गुन्हे सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीने नागपूर शहरातील आणि आसपासच्या भागातील अनेक नागरिकांना अशाच प्रकारे फसवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या टोळीच्या हनीट्रॅपला बळी पडलेले इतर कोणी असल्यास त्यांनी भीती न बाळगता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून, आरोपींकडून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे हनीट्रॅपसारख्या गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापूर : पोटच्या पोराने आई-वडिलांना क्रूरपणे संपवलं, हाताच्या नसा कापल्या, काठीने बेदम मारलं

 

    follow whatsapp