Santosh Deshmukh murder case hearing : बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आज (दि.19) बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावे, अशी मागणी आरोपींकडून न्यायालयात करण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी सुनावणीदरम्यान हा अर्ज सादर केल्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
सरकारी वकील उज्ज्वल निकम राजकीय पक्षाशी निगडित, आरोपींचा कोर्टात अर्ज
आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, तसेच निष्पक्ष न्यायप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. या कारणास्तव तातडीने त्यांची नियुक्ती रद्द करून अन्य सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी आरोपींकडून करण्यात आली आहे.
आजची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या प्रकरणाची ही पहिलीच सुनावणी ठरली. या सुनावणीत प्रकरणावर आरोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यानंतर प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांची सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींच्या अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. “कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की एखादा वकील राजकीय पार्श्वभूमीचा असल्यामुळे तो खटला लढू शकत नाही. मी व्यावसायिक वकील म्हणून माझी जबाबदारी पार पाडत असून, आरोपींचा अर्ज निराधार आहे,” असे निकम यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्यांनी हा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, न्यायालयाने या अर्जावर तात्काळ निर्णय न देता आदेश राखीव ठेवला आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कायम राहणार की नाही, याबाबतची स्पष्टता पुढील आदेशानंतरच होणार आहे.
आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद मांडला, तर विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते. आरोपींच्या वतीने वकील विकास खाडे, अनंत तिडके, राहुल मुंडे आदी न्यायालयात हजर होते. आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर सादर झाले.
बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश पाटवदकर यांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरू असून, आरोप निश्चितीनंतर आता साक्षीदारांचे जबाब, तपासी अधिकाऱ्यांचे साक्षीपुरावे आणि गोपनीय साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला या टप्प्यावर निर्णायक वळण मिळण्याची शक्यता असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला, बॉडी नग्न अवस्थेत सापडली; चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर
ADVERTISEMENT











