Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये शुक्रवारी (दि.19) पहाटे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची अत्यंत निर्दयपणे हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना हुपरी येथील महावीरनगर कॉलनीत आज सकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास घडली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय सुनील नारायण भोसले याचा घराच्या वाटपावरून आपल्या वृद्ध आई-वडिलांशी वारंवार वाद होत होता. याच वादाचा भडका उडत आज पहाटे सुनीलने आपले वडील नारायण गणपतराव भोसले (वय 78) आणि आई विजयमाला नारायण भोसले (७०) यांच्यावर हल्ला केला. प्रथम त्याने दोघांच्याही हातांच्या नसांवर वार केला. त्यानंतर दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. या अमानुष हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सुनील भोसले स्वतः हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यात येताना किंवा चौकशीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही पश्चात्तापाची भावना दिसून आली नाही. यामुळे उपस्थित पोलीस आणि नागरिकांमध्येही संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा : Personal Finance: 25 हजार पगार असणारेही होतील धनवान, ’असे’ मिळतील 10 लाख रुपये
या घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोलपे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड, काठ्या आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करत तपासासाठी नमुने गोळा केले.
दरम्यान, इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. नारायण आणि विजयमाला भोसले यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.
भोसले दाम्पत्याला तीन मुले होती. मोठे दोन मुलगे चंद्रकांत आणि संजय हे आपल्या कुटुंबासह गावाबाहेर राहत होते, तर धाकटा मुलगा सुनील आई-वडिलांसोबत राहात होता. सुनीलचे वर्तन संशयी आणि विचित्र असल्याचे सांगितले जाते. लग्नानंतर काही काळातच त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. सुनील हुपरी शहरात चांदीच्या वस्तूंचा छोट्या प्रमाणावर व्यवसाय करत होता. मात्र, संपत्तीच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याची चर्चा परिसरात आहे.
या घटनेमुळे हुपरी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, सकाळपासून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची इतक्या निर्दयपणे हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हुपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपी सुनील भोसले याला अटक करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नगर परिषद निवडणूक: ‘आज’ निवडता येणार तुमचा नगरसेवक, 154 वॉर्डात मतदान.. पाहा संपूर्ण यादी!
ADVERTISEMENT











