Pune Politics : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील स्थानिक नेत्यांच्या भाजप प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. राष्ट्रवादीत कार्यरत असलेले अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तर काही नेते प्रवेशाच्या तयारीत आहेत. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील तगडा धक्का बसलाय. कारण पक्षाने आमदार केलेल्या नेत्याचा मुलगा आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
ADVERTISEMENT
वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्षकार्यालयात दाखल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच बापूसाहेब पठारे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता. मात्र, वर्षभरातच त्यांच्या मुलाने वेगळा मार्ग निवडलाय.
विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन भाजपचे नेते बापू पठारे यांनी वडगाव शेरीतून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र महायुतीतील जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. त्या वेळी पठारे पिता-पुत्रांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेऊन भाजपचा राजीनामा दिल्याची चर्चा होती.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पठारे पिता-पुत्रांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या प्रभागातून मोहोळ यांना आघाडीही मिळाली होती. त्यामुळे पठारे कुटुंबाचे भाजपशी असलेले स्नेहसंबंध कायम राहिले होते. या पार्श्वभूमीवर सुरेंद्र पठारे यांनी भाजपशी असलेली जुनी नाळ अधिक मजबूत करत पुन्हा पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. मात्र आमदार बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येने देखील पक्षांतर केले आहे. रमेश वांजळे यांच्या कन्या राष्ट्रवादीत कार्यरत होत्या. मात्र, आता त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे पुण्यात भाजपने निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षप्रवेश देत संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचं चित्र आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येचा भाजपमध्ये प्रवेश, पुण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का
ADVERTISEMENT











