डोंबिवली: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात भारतीय जनता पार्टीकडून भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याच मेळाव्याला संबोधित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एक अत्यंत मोठं आणि सर्वांच्या भुवया उंचावणारं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
रवींद्र चव्हाण भाषणादरम्यान म्हणाले की, ‘काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप डोंबिवलीकर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या शहीद नागरिकांचे अंतिम दर्शन याच मैदानात झाल्याने, ती आठवण कायम जिवंत ठेवण्याची गरज आहे.‘
मेळाव्यात देशावर झालेल्या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस उत्तर दिल्याचे सांगत ‘सिंदूर’ कारवाईद्वारे भारताच्या लष्करी पराक्रमाचे दर्शन संपूर्ण जगाला घडल्याचे नमूद करण्यात आले. काही काँग्रेस व विरोधी पक्षातील नेत्यांची देशविरोधी वक्तव्ये निषेधार्ह असल्याची टीका यावेळी करण्यात आली. राजकारणापेक्षा देशभक्ती आणि राष्ट्रहित मोठे असल्याचे जनतेला समजले पाहिजे, असे आवाहनही करण्यात आले.
‘2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अखंडपणे लढत असून 24x7 देश आणि देशवासीयांचा विचार करणारे ते एकमेव नेते असल्याचा दावा करण्यात आला. गेल्या 11 वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध न झाल्याने पारदर्शक, स्वच्छ आणि कुटुंबवादमुक्त नेतृत्व मिळाले.’
महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्याला सशक्त दिशा मिळाल्याचे सांगण्यात आले. 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत आघाडीवर होता, तर महाविकास आघाडीच्या काळात विकासकामे रखडली आणि कार्यकर्त्यांवर अन्याय व खोट्या केसेस लादल्या गेल्याचा आरोप करण्यात आला.
पुन्हा सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र गतिमान करण्याचे काम सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” ही कार्यशैली राबवत महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योग आणण्यावर भर देण्यात येत असून, प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मेट्रोसारखी महत्त्वाची कामे महाविकास आघाडीत रखडली होती, मात्र महायुती सरकारने त्यांना गती दिल्याचा दावा करण्यात आला. केंद्र सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी दहापटीने अधिक निधी मिळत असून पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही नमूद करण्यात आले.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विकास म्हात्रे यांच्यावर टीका करत, “ही निवडणूक कोणीतरी शेठ याला निवडून देण्यासाठी नाही, तर तुमचं-आमचं सर्वांचं भविष्य ठरवणारी आहे,” असे ठाम मत व्यक्त केले. ओळखीच्या नेत्यासाठी नव्हे तर विकासासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. केरळसारख्या राज्यातही विकासाच्या मुद्द्यावर भाजपचा महापौर निवडून आल्याचे उदाहरण देण्यात आले.
ढोल-ताशांच्या भूलथापांना बळी न पडता सजग राहण्याचे आवाहन करत, “रवी चव्हाण तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत, हे विसरू नका,” असा संदेश देण्यात आला. 15 तारखेला कमळाला मतदान करण्याचे आवाहन करत, घरोघरी जाऊन भाजपची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना देण्यात आले. मतदानाची वेळ चुकवू नका, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही. राष्ट्रासाठी, विकासासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी योग्य वेळी, योग्य ठिकाणी मतदान करा,’ असे आवाहन करत मेळाव्याची सांगता करण्यात आली.
ADVERTISEMENT











