मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी एक स्पष्ट अट मांडली असून, आधी उद्धव ठाकरे आणि मनसेने आपापसातील जागावाटप निश्चित करावे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागांचा प्रस्ताव द्यावा, अशी भूमिका पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उर्वरित घटक पक्षांची भूमिका निर्णायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणती दिशा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, आता त्यांच्या खात्याचा पदभार कोणाकडे? राष्ट्रवादीकडून मोठी अपडेट समोर
या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मुंबई महापालिकेतील आघाडी, जागावाटप आणि पुढील राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. पवारांनी या चर्चेदरम्यान आपली भूमिका स्पष्ट करताना, आधी उद्धव ठाकरे आणि मनसेने आपसातील जागावाटपाचा आराखडा ठरवावा, असे सूचित केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला किती आणि कोणत्या जागा अपेक्षित आहेत, याबाबत प्रस्ताव दिला जाईल. मात्र, पक्षाला सन्मानजनक आणि परिणामकारक संख्येने जागा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी ठामपणे मांडले.
दरम्यान, या बैठकीत संजय राऊत यांनी पवारांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधण्याची विनंती केल्याचे कळते. विरोधी पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेत संयुक्त लढत यशस्वी होण्यासाठी सर्व पक्षांमध्ये समन्वय आणि स्पष्टता गरजेची असल्याचेही या चर्चेत अधोरेखित झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेसह निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याचे सांगितले. मात्र, अंतिम निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत भूमिका कधी जाहीर होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
एकीकडे काँग्रेसने आघाडीपासून अंतर राखल्याने समीकरणे बदलली असतानाच, शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग होतो का, यावर मुंबई महापालिकेतील राजकीय चित्र ठरणार आहे. त्यामुळे पवारांकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











