Zilla Parishad Election 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात बदल केला होता. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान पुढे ढकलत आज 7 फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. तसेच मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे.
ADVERTISEMENT
राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत असून, जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदार आपला कौल देणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या 54 गटांसह पंचायत समितीच्या 108 गणांसाठी ही निवडणूक होत आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 1 हजार 278 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जात असून त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून आज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मतदान यंत्रे, मतदार याद्या आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले. हे साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. या निवडणुकीत 54 गटांसाठी 247 तर 108 गणांसाठी 433 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत येणाऱ्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा तसेच त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्याने मतदानाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने आज राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर पवार कुटुंबीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासह विजया पवार, नीता पवार, आशा पवार, तसेच श्रीनिवास पवार, शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार हेही मतदान करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पोलिसांना बैलांनी केली मदत; खूनाच्या आरोपीपर्यंत पोहोचवले, पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह
ADVERTISEMENT











