नागपूर: महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी केलेले भाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे कमी होत चाललेली एकाग्रता, तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व, संकटांना सामोरे जाण्याची क्षमता आणि देशसेवेची प्रेरणा अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना थेट आणि प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले. पण यावेळी त्यांनी एक जे विधान केलं त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ADVERTISEMENT
'आजच्या Gen Z ला काही बोलणंही कठीण झालं आहे'
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आजच्या तरुणांच्या मोबाईल व्यसनावर भाष्य केले.
"आता आपण मोबाईलवर बिझी होतो.. Gen Z ला काय बोलू शकतो आता आपण? त्यांना बोलणंही अवघड झालंय. स्क्रीन टाइम 6 तास, 7 तास.. स्क्रोलिंग.. पण 5 सेकंदात इथून तिथे, तिथून दुसरीकडे.. आपला मेंदू सारखा उड्या मारतोय. त्यामुळे मेंदूमध्ये काय केमिकल लोचा होतो ते कोणीही समजू शकत नाही."
"Focus करा, म्हणजे शिकाल. शिकाल तर प्रगती कराल. आणि प्रगती केली तरच आयुष्याचा आनंद खऱ्या अर्थाने घेता येईल. त्यामुळे आधी विकास, मग मनोरंजन."
16 ते 18 वर्षे आयुष्य घडवणारी
विश्वास नांगरे-पाटील यांनी संस्कृतमधील एका श्लोकाचा संदर्भ देत सांगितले की तरुणपण, संपत्ती, सत्ता आणि विवेकाचा अभाव यांपैकी एक गोष्टही आयुष्य बिघडवण्यासाठी पुरेशी असते. त्यांनी सांगितले की 16 ते 18 वर्षे हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. याच वयात मेंदूतील प्री-फ्रंटल कॉर्टेक्स विकसित होत असतो, जो निर्णयक्षमता आणि विवेकाशी संबंधित आहे.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत म्हटले,
"छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली होती."
IQ पेक्षा संकटांशी लढण्याची क्षमता महत्त्वाची
ते म्हणाले की केवळ बुद्धिमत्ता (IQ) पुरेशी नसते. त्यांच्या मते चार प्रकारचे प्रश्न प्रत्येक व्यक्तीसमोर असतात
- बौद्धिक (Intelligence)
- भावनिक (Emotional)
- सामाजिक (Social)
- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची क्षमता (Adversity Quotient)
"कठीण परिस्थितीत आपण कसे उभे राहतो, हेच आपल्या यशाचं खरं मोजमाप ठरतं."
विक्रम बत्रा आणि मनोज पांडे यांच्याकडून घ्या प्रेरणा
देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांचा उल्लेख करत त्यांनी कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांसारख्या वीरांचे उदाहरण दिले.
ते म्हणाले, "शहीदांच्या चितांवर दरवर्षी मेळे भरतील. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांचे आदर्श कायम आपल्या समोर राहिले पाहिजेत."
'स्वतःला ओळखा, प्रतिस्पर्ध्यालाही ओळखा'
चीनचे लष्करी तज्ज्ञ सुन त्झू यांच्या 'आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले
- स्वतःलाही ओळखा आणि प्रतिस्पर्ध्यालाही ओळखा, मग प्रत्येक लढाई जिंकता येते.
- स्वतःला ओळखत असाल पण प्रतिस्पर्ध्याला नाही, तर प्रत्येक विजयामागे पराभवाची शक्यता असते.
- आणि दोघांनाही ओळखत नसाल तर पराभव निश्चित असतो.
'जेव्हा आई भारतमाता बनते...'
पोलीस सेवेतल्या अनुभवांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले,
"जेव्हा तुमची वेदना तुमचं शस्त्र बनते, शाळा प्रशिक्षण केंद्र बनते, शिक्षक प्रशिक्षक बनतात आणि तुमची आई भारतमाता बनते, तेव्हाच तुमच्यातला सैनिक जागा होतो."
'मी खाकी आहे...' कवितेने जिंकली मनं
भाषणाच्या शेवटी त्यांनी 'मी खाकी आहे' ही स्वतःची प्रेरणादायी कविता सादर केली.
"दिवस असो वा रात्र... मी खाकी आहे.
वादळ असो वा पाऊस... मी खाकी आहे.
अंधारात मी प्रकाश आहे.
कठीण काळात मी आशा आहे.
हाक मारली की धावत येणारी... मी खाकी आहे."
ADVERTISEMENT












