जर्मनीची तरुणी ठाकरेंच्या मोर्चात पोहचली, मोदींवर बोलली ते ऐका VIDEO

मुंबई तक

27 Jul 2026 (अपडेटेड: 27 Jul 2026, 08:33 AM)

German woman reacts Mumbai victory rally of Thackeray group : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील विजय रॅलीत सहभागी झालेल्या जर्मन तरुणीने भारताच्या शिक्षण व्यवस्था आणि युवकांबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. लोकांचा आवाज ऐका आणि युवकांसाठी काम करा, असा संदेश देतानाच भारतात सकारात्मक बदलाची अपेक्षा तिने व्यक्त केली.

German woman reacts Mumbai victory rally of Thackeray group

German woman reacts Mumbai victory rally of Thackeray group

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जर्मनीची तरुणी ठाकरेंच्या मोर्चात पोहचली

point

मोदींवर बोलली ते ऐका

German woman reacts Mumbai victory rally of Thackeray group : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत विद्यार्थ्यांनी विजय जल्लोष रॅली काढली. या रॅलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सहभाग घेतला. या सेलिब्रेशनदरम्यान जर्मनीहून मुंबईत आलेल्या एका तरुणीने भारतीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत, शिक्षण व्यवस्थेबाबत आणि केंद्र सरकारबाबत आपले मत व्यक्त केले. भारतात अनेक मित्र असल्याने आणि या देशाविषयी विशेष प्रेम असल्याचे सांगत तिने या विजयाच्या वातावरणाचा भाग बनण्याचा आनंद व्यक्त केला. मुंबईतील शांततापूर्ण आणि एकजुटीचे वातावरण पाहून आपण प्रभावित झाल्याचेही तिने सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा : Gen Z आंदोलन: ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाईंनी सांगितल्या 'त्या' 5 मोठ्या गोष्टी, ज्यांनी बदलली देशाच्या राजकारणाची दिशा!

'मोर्चात सहभागी होणार होते, पण विजयी सोहळ्यात रूपांतर झाले'

त्या तरुणीने आपण आंदोलनाविषयी माहिती ठेवत असल्याचे सांगितले. या आंदोलनामुळे झालेल्या घडामोडींमुळे आनंद झाल्याचे सांगत, आपण मूळतः आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार होतो, मात्र त्याचे विजयी सोहळ्यात रूपांतर झाल्याने अधिक आनंद झाल्याचे ती म्हणाली. देशभरातील विविध वयोगटातील लोक एकत्र येऊन शांततेत विजय साजरा करत असल्याचे दृश्य पाहणे प्रेरणादायी असल्याचे तिने नमूद केले. केवळ तरुणच नव्हे, तर सर्वच वयोगटातील नागरिक एकत्र आल्याचे पाहून समाधान वाटल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा : विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

जेन झी अन् आगामी पिढ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे

भारतातील शिक्षण व्यवस्थेबाबत विचारले असता, कोणत्याही देशाने सर्वप्रथम लोकांचे अनुभव आणि त्यांच्या आवाजाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तिचे मत होते. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता झपाट्याने बदलत असल्यामुळे शिक्षण व्यवस्थेनेही त्या बदलांशी जुळवून घेण्याची गरज असल्याचे ती म्हणाली. नवीन पिढीच्या अपेक्षा, गरजा आणि बदललेले जग समजून घेतले पाहिजे. जनरेशन झेड आणि आगामी पिढ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, कारण जग बदलले आहे आणि शिक्षण व्यवस्थेलाही त्यानुसार बदलावे लागेल, असे तिने स्पष्ट केले. भारत हा मोठा देश असल्याने सर्व व्यवस्था बदलण्यासाठी वेळ लागेल, मात्र सध्याचे आंदोलन हा सकारात्मक बदलाचा प्रारंभ ठरू शकतो, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

जर्मनीबाबत बोलताना, आपल्या देशातही तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक वेगाने प्रगती करण्याची गरज असल्याचे त्या तरुणीने मान्य केले. सध्याच्या जगासाठी आवश्यक असलेले शिक्षण आणि कौशल्य विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे, असे तिचे मत होते. भारत सरकारला संदेश देताना तिने, "लोकांचे ऐका. युवक हे देशाचे भविष्य आहेत. सरकारने लोकांसाठी काम केले पाहिजे, लोकांनी सरकारसाठी नाही," असे सांगितले. भारतात शांततापूर्ण आंदोलन झाले असून विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज योग्य नव्हता, त्याबाबत कारवाई व्हायला हवी, असेही तिने म्हटले. त्याचवेळी भारतात आवश्यक बदल होतील, अशी सकारात्मक भावना असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर काहीतरी पाऊल उचलतील, अशी आशाही तिने व्यक्त केली.