'Friends..', PM मोदींचा नवा Reel; काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या व्यक्तीकडे Task Force ची जबाबदारी

मुंबई तक

26 Jul 2026 (अपडेटेड: 26 Jul 2026, 09:00 PM)

PM Modi New Reel: नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारणांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार कार्यदलाच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

pm modi shares another insta reel nandan nilekani who contested elections on a congress ticket entrusted with responsibility of task force

PM Modi Instagram Reel

Google CTA

नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरणी आंदोलनाची धग वाढल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे रिल्सच्या माध्यमातून तरूणांशी सातत्याने संवाद साधत आहे. आज (26 जुलै) पुन्हा एकदा त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी परीक्षा सुधारणांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार टास्क फोर्सची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

पाहा नव्या Reel मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर परीक्षा सुधारणांसंदर्भात एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले,

"भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलत आहे. ज्यांनी आपल्या भविष्याशी तडजोड केली आहे, ते तुरुंगात सडत आहेत."

त्यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केली आहेत आणि संसदेत कठोर तरतुदींसह नवीन कायदा लागू करण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. पण आपण भविष्याचा विचार केला पाहिजे.'

हे ही वाचा>> Gen Z आंदोलन: ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाईंनी सांगितल्या 'त्या' 5 मोठ्या गोष्टी, ज्यांनी बदलली देशाच्या राजकारणाची दिशा!

पंतप्रधान मोदी म्हणाले,

"आपली परीक्षा प्रणाली विश्वासार्ह, पारदर्शक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असली पाहिजे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, आम्ही जागतिक ख्यातीचे तंत्रज्ञान तज्ञ नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक हाय-पावर टास्क फोर्स  स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.''

पंतप्रधानांनी सांगितले की, ''हे टास्क फोर्स परीक्षा सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे, आगामी परीक्षांची विश्वासार्हता लवकरात लवकर सुनिश्चित केली जाईल. खूप खूप धन्यवाद.''

कोण आहेत नंदन नीलेकणी?

नंदन नीलेकणी हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीचे उद्योजक आहेत. ते इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि आधार कार्डचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव नंदन मोहनराव नीलेकणी आहे. 2 जून 1955 रोजी कर्नाटकातील बंगळूर येथे जन्मलेले नंदन नीलेकणी हे IIT मुंबईचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत.

हे ही वाचा>> विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

1981 मध्ये, नंदन नीलेकणी यांनी एन. आर. नारायण मूर्ती आणि सहा सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ही कंपनी नंतर भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक बनली. त्यांनी 2002 ते 2007 पर्यंत इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी म्हणून काम केले. नंतर 2017 मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष म्हणून परतले.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने 2009 मध्ये त्यांची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आधार प्रकल्प सुरू करण्यात आला, ज्याद्वारे भारतीय रहिवाशांना 12-अंकी ओळख क्रमांक प्रदान करण्यात आला. आज, आधार ही जगातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रणालींपैकी एक मानली जाते.

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेसने बंगळूर दक्षिण मतदारसंघातून नंदन नीलेकणी यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले होते. तथापि, ते भाजपचे अनंत कुमार यांच्याकडून दोन लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले होते. यानंतर, त्यांनी सक्रिय निवडणूक राजकारणातून माघार घेतली होती.

टास्क फोर्समध्ये कोणाकोणाच्या समावेश?

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)च्या परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय (High Powered) टास्क फोर्स स्थापन केली आहे. ही बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) तज्ज्ञ समिती विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर, परीक्षा प्रणालीतील संरचनात्मक सुधारणा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी शिफारसी करणार आहे.

या टास्क फोर्समध्ये विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे:

  • नंदन निलेकणी – तंत्रज्ञान तज्ज्ञ

  • एस. सोमनाथ – इस्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष

  • तपन डेका – इंटेलिजन्स ब्युरो (IB)चे माजी संचालक

  • व्ही. कामकोटी – आयआयटी मद्रास (IIT Madras)चे संचालक

  • अनिता करवाल – शिक्षण विभागाच्या माजी सचिव

  • अमृत लाल मीणा – लॉजिस्टिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ

या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे NTAच्या परीक्षा प्रणालीला अधिक सुरक्षित, पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि विश्वासार्ह बनवणे, तसेच भविष्यात पेपरफुटी किंवा इतर गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचवणे.