'मोदींनी कॅमेऱ्याचा नाही मनाचा अँगल बदलावा..', प्रियांका गांधींची लोकसभेत तुफान फटकेबाजी

मुंबई तक

• 05:56 PM • 28 Jul 2026

लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदींच्या Instagram रीलवर देखील उपरोधिकपणे टीका केली.

prime minister modi needs to change his hearts angle not camera angle priyanka gandhi criticized in lok sabha on neet leak protest

प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

Google CTA

नवी दिल्ली: लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर (Anti Paper Leak Bill) सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पेपर लीक प्रकरणे, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई, शिक्षण व्यवस्था, रोजगार, शिक्षणाचा अर्थसंकल्प आणि सरकारच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या काही वक्तव्यांना आक्षेप घेतला होता. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता.

हे वाचलं का?

पेपर लीकविरोधी विधेयकावर 10 तास चर्चा

एक दिवस आधी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयक मांडले होते. मात्र विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात भूमिका मांडावी, अशी मागणी केल्यामुळे चर्चा सुरू होऊ शकली नव्हती.

दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होताच सुरुवातीला सहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र विरोधकांनी चर्चा वाढवण्याची मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार 10 तास चर्चेसाठीही तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाची संमती घेत अँटी पेपर लीक विधेयकावर तब्बल 10 तास चर्चा होणार असल्याची घोषणा केली.

'कायदा झाला, पण एकालाही शिक्षा नाही'

प्रियंका गांधी म्हणाल्या की, 2024 मध्ये पेपर लीकविरोधी कायदा मंजूर झाला असला तरी आजपर्यंत एका आरोपीलाही शिक्षा झालेली नाही. त्यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक केली जात आहेत, मात्र पेपर लीकच्या आरोपींविरोधात तशीच कठोर कारवाई होताना दिसत नाही.

हे ही वाचा>> धर्मेंद्र प्रधान यांचं संसदेत जंगी स्वागत, भाजप विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय?

'नव्या समित्या नव्हे, ठोस निर्णय हवेत'

सरकारच्या उपाययोजनांवर टीका करत त्यांनी म्हटले की, केवळ नवीन समित्या स्थापन करून प्रश्न सुटणार नाहीत.

राधाकृष्णन समितीचा उल्लेख करत त्यांनी त्या समितीच्या रचनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी केलेल्या एका टिप्पणीवर सभागृहात हशा पिकला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील हसल्याचे पाहायला मिळाले.

'पंतप्रधानांनी कॅमेऱ्याचा नव्हे, मनाचा अँगल बदलावा'

सरकारवर टीका करत प्रियंका गांधी म्हणाल्या,

"Gen Z चा विश्वास जिंकण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवून उपयोग होणार नाही. पंतप्रधानांनी कॅमेऱ्याचा अँगल बदलण्यापेक्षा मनाचा अँगल बदलण्याची गरज आहे. देशाच्या तरुणांसमोर उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे."

'लाठी विद्यार्थ्यांच्या पाठीवर नव्हे, सरकारच्या प्रतिमेवर बसली'

विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, "विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली लाठी ही प्रत्यक्षात सरकारच्या विश्वासार्हतेवर बसलेली आहे. सरकारने स्वतःची साख वाचवली पाहिजे."

'देशातील सर्वात मोठी चोरी म्हणजे तरुणांची स्वप्ने हिरावली' 

सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले, "निवडणुकांतील मतांची चोरी, विविध घोटाळ्यांचे आरोप आपण ऐकले. पण सर्वात मोठी चोरी ती होती, जेव्हा देशातील तरुणांचे भविष्य आणि त्यांची स्वप्ने हिरावली गेली."

हे ही वाचा>> पेपर फोडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर

त्या पुढे म्हणाल्या की, देशातील युवकांचा विश्वास तुटला तर ती भारताची हार ठरेल आणि विरोधी पक्ष देशाच्या हितासाठी लढत राहतील.

'विद्यार्थ्यांवर अश्रुधूर आणि लाठीमाराची गरज काय होती?'

प्रियंका गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतल्याचा अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, रुग्णालयात एका विद्यार्थिनीच्या आईने अत्यंत वेदनादायी शब्दांत आपली व्यथा मांडली. त्यावरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारला,

"विद्यार्थ्यांवर अश्रुधूर का सोडला? लाठीचार्ज का करण्यात आला? मुलींना अपमानित करण्याची गरज काय होती? ते दहशतवादी होते का? हा आदेश कोणी दिला? देशातील तरुणांच्या आवाजाला तुम्ही का घाबरता?"

'हे संसद भवन जनतेचं आहे'

भाषणाच्या शेवटी प्रियंका गांधी म्हणाल्या, "हे संसद भवन कोणाच्याही मालकीचे नाही. ही देशाच्या जनतेची अमानत आहे. आपण सर्वजण जनतेचे सेवक आणि प्रतिनिधी आहोत. सत्ता देखील जनतेनेच दिली आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे."