Thane and Kalyan Dombivali Municipal Election : सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून अजूनही संभ्रम आणि नाराजीचा सूर आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात नेमक्या किती आणि कुठल्या जागा कोणाला मिळणार, यावर ठोस निर्णय होताना दिसत नाही. महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी अंतर्गत मतभेद उफाळून येत असून, नाराजी थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत, विरोधी बाजूला मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही गाजावाजा न करता महत्त्वाच्या महापालिकांमध्ये जागावाटपाचा मोठा टप्पा पार केल्याचे चित्र समोर आले आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे बंधूंची ठाणे महापालिकेसाठी 90 टक्के जागांवर सहमती
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. ठाणे महापालिकेत सुमारे 90 टक्के जागांवर सहमती झाली असून, मीरा-भाईंदरमध्ये हे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. वसई-विरारमध्ये सुमारे 90 टक्के, तर कल्याण-डोंबिवलीत 85 टक्के जागावाटप निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. केवळ काही मोजक्या जागांवर चर्चा बाकी असून, त्या देखील लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.
महायुतीत पक्षप्रवेश, उमेदवारी आणि जागावाटपावरून जेव्हा गोंधळ वाढत होता, त्याच काळात ठाकरे बंधूंमध्ये पडद्यामागे समन्वयाची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी कामाला वेग दिला. ठाणे विभागासह अन्य महापालिकांमध्ये संभाव्य जागावाटपाचे आराखडे तयार करण्यात आले आणि त्यावर सलग बैठका झाल्या.
मागील आठवड्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समोरासमोर बैठका झाल्याची माहिती आहे. या बैठकीत जुन्या वादविवादांना बाजूला ठेवत, निवडणुकीत एकत्र कसे उतरायचे यावर भर देण्यात आला. प्रत्येक प्रभागातील ताकद, मागील निवडणुकांचे निकाल आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन जागावाटपावर जवळपास एकमत झाले, असे सांगितले जात आहे.
या टप्प्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश अद्याप झालेला नाही. मात्र, भविष्यात त्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला, तर काही जागांवर समायोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.
दरम्यान, ठाकरे बंधूंची युती अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर राज्यभर संयुक्त सभा घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक आणि मीरा-भाईंदरसह प्रमुख शहरांमध्ये 6 ते 7 सभा होण्याची शक्यता आहे. एकाच व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसावेत, अशी अपेक्षा मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटत नसताना, दुसरीकडे ठाकरे बंधू शांतपणे पण ठामपणे निवडणुकीसाठी सज्ज होत असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला, बॉडी नग्न अवस्थेत सापडली; चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर
ADVERTISEMENT











