माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, आता त्यांच्या खात्याचा पदभार कोणाकडे? राष्ट्रवादीकडून मोठी अपडेट समोर

Manikrao Kokate : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण होईपर्यंत क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्यांचा पदभार अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळात तातडीचा फेरबदल होणार नसल्याचं संकेत मिळत आहेत.

Manikrao Kokate

Manikrao Kokate

मुंबई तक

• 09:17 AM • 19 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलं

point

आता त्यांच्या खात्याचा पदभार कोणाकडे?

point

राष्ट्रवादीकडून मोठी अपडेट समोर

Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका मिळवल्याप्रकरणी न्यायालयाकडून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातून त्यांची एक्झिट झाल्यानंतर आता त्यांच्या खात्यांचा पदभार नेमका कोण सांभाळणार आणि रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडामंत्री होते. याआधीही वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांना कृषीमंत्रीपद गमवावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा गंभीर आरोप आणि न्यायालयीन निर्णयामुळे त्यांच्या कारकिर्दीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटेंचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हते. उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करावी, असा त्यांचा विचार होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यास स्पष्ट विरोध दर्शवल्याने अखेर राजीनामा स्वीकारावा लागल्याचं सांगितलं जात आहे.

माणिकराव कोकाटेंच्या खाताचा पदभार अजित पवार सांभाळणार

कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्यांचा तात्पुरता पदभार कोणाकडे जाणार, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण होईपर्यंत क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्यांचा पदभार अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळात तातडीचा फेरबदल होणार नसल्याचं संकेत मिळत आहेत.

दरम्यान, रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झालं आहे. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा वेगाने सुरू झाली होती. कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी मिळू शकते, असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे. मात्र, वाल्मिक कराड प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या आरोपांमुळे त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन सोपं नसल्याचंही बोललं जात आहे. तरीदेखील सध्याच्या घडीला तेच सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

दुसरीकडे, अजित पवार हे अंतिम निर्णय घेताना जातीय आणि प्रादेशिक समीकरणांचा विचार करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या यादीत अनिल पाटील, संजय बनसोडे यांचीही नावं चर्चेत आहेत. यासोबतच, पक्षात नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयोग होणार का, याकडेही लक्ष वेधलं जात आहे. जर मराठा समाजातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा विचार झाला, तर प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप किंवा सुनील शेळके यांच्यासारखी नावं पुढे येऊ शकतात.

एकूणच, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतरच याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं स्पष्ट होत असलं, तरी नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. अजित पवार यांचा पुढचा डाव काय असेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

8 वर्षीय मुलीवर शेजारील तरुणाकडून लैंगिक अत्याचार, लष्करी क्वार्टरमध्ये आढळला मृतदेह, हादरवणारी घटना

    follow whatsapp