Manikrao Kokate: सर्वात मोठी बातमी... CM फडणवीसांनी केली माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी, पण...

मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कोर्टाने कायम ठेवल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:00 PM • 17 Dec 2025

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणी कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, माणिकराव कोकाटे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत राजीनामा न दिल्याने आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. 

हे वाचलं का?

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिफारसनसीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारी सर्व खाती काढून घेतली आहेत. कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण हे कॅबिनेट खातं होतं. जे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपावण्यात आलं आहे.

याचाच अर्थ माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंकडील खाती काढून त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवलं आहे. त्यामुळे आता कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा केव्हा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'कोकाटेंकडील खाती काढून घ्या' मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यपालांना केलेली शिफारस 

माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदाचा राजीनामा देत नसल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना अशी शिफारस केली की, कोकाटे यांच्याकडील खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात यावीत. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही शिफारस राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी स्वीकारली असून त्यासंबंधीचं पत्र त्यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. वाचा ते पत्र जसंच्या तसं..

राज्यापालांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेलं ते पत्र जसंच्या तसं...

आदरणीय श्री फडणवीसजी,

मला आपले १७ डिसेंबर, २०२५ रोजीचे पत्र मिळाले आहे, ज्यामध्ये आपण मंत्री ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्याकडील "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" या खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क) श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांना सोपवण्याची शिफारस केली आहे.

मी आपल्या उपरोक्त शिफारशीला याद्वारे माझी मंजुरी देत आहे.

आचार्य देवव्रत
(राज्यपाल)

कोकाटेंना कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेचं नेमकं प्रकरण काय?

माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते असून, सध्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी खातं होतं. मात्र, विधानसभेत मोबाइलवर रमी खेळत असल्याच्या वादातून त्यांना कृषी खातं गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं. दुसरीकडे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील सदनिका फसवणूक प्रकरणी कोर्टाने शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अटकेचा निर्णय कायम ठेवला, ज्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राज्यघटनेनुसार, एखाद्या मंत्र्याला गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास त्याचे मंत्रिपद रद्द होतं. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागते.

कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू केली असली तरी सध्या त्यांच्यावर दबाव वाढला आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले की, कोकाटे हे अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या मंत्रिपदावरून पक्षाला धक्का बसू शकतो, अशी चर्चा आहे.

    follow whatsapp