मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी तात्काळ भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसलू मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. दरम्यान, भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेसला विधानपरिषदेत मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे पक्षाची महिला नेत्या आणि मराठवाड्यातील महत्त्वाचा चेहरा काँग्रेसने गमावला आहे, तर दुसरीकडे विधानपरिषदेतील संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेते पदावर दावा देखील कमकुवत झाला आहे.
विधानपरिषदेतील संख्याबळ आणि नियम काय सांगतात?
महाराष्ट्र विधानपरिषदेत एकूण 78 जागा आहेत. विरोधी पक्षनेते पद ओळखण्यासाठी आणि त्याच्या सुविधा मिळवण्यासाठी संबंधित पक्षाकडे विधानपरिषदेतील किमान 10 टक्के सदस्यसंख्या (म्हणजे किमान 8 जागा) असणे आवश्यक असते. आतापर्यंत काँग्रेसकडे विधानपरिषदेत 8 आमदार होते, ज्यामुळे विरोधी पक्षातील सर्वाधिक जागा असलेल्या पक्ष म्हणून त्यांचा या पदावर दावा होता. पण प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ 7 वर आले आहे. यामुळे आता काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणे अशक्य झाले आहे.
हे ही वाचा>> "19 डिसेंबर रोजी काय होईल, ते कठीण.." पंतप्रधान पदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे (शिवसेना UBT, राष्ट्रवादी शरद पवार गट) कमी जागा असल्याने हे पद रिक्त राहण्याची किंवा दुसऱ्या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.
राजीव सातव यांच्या निधनानंतर 2021 साली त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधानपरिषदेत संधी दिली होती. त्यानंतर 2024 साली पुन्हा एकदा त्यांना काँग्रेसकडून विधान परिषदेचं उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्या निवडून देखील आल्या होत्या. त्यामुळे 2030 पर्यंत त्यांच्या आमदारकीचा कालावधी होता. मात्र, आज भाजप प्रवेश करण्याआधीच त्यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला.
राज्यात काँग्रेस कमकुवत
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
हे ही वाचा>> दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी भाजप प्रवेशासाठी आमदारकीचा राजीनामा देणार, काँग्रेसला तगडा झटका
महाराष्ट्रात काँग्रेसला सतत धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी कमळ हाती घेतलं आहे. त्यात आता प्रज्ञा सातव यांची देखील भर पडली आहे. दुसरीकडे सातवांच्या राजीनाम्यामुळे विधानपरिषदेत काँग्रेसची ताकद आणखी कमी झाली आहे.
या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि विरोधी पक्षाची भूमिका यावर परिणाम होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपसाठी मात्र हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे.
ADVERTISEMENT











