US democrats release 68 epstein nws photos : अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधील डेमोक्रॅट्सनी गुरुवारी लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या जेफ्री एपस्टीनच्या मालमत्तेतून 68 नवे फोटो जगासमोर आणले आहेत. या छायाचित्रांच्या प्रसिद्धीमागील उद्देश म्हणजे एपस्टीनचे प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करणे. एपस्टीनचा तुरुंगात मृत्यू होण्यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या 95,000 फोटोंच्या संग्रहातून हे फोटो हाऊस ओव्हरसाइट कमिटीला 2019 मध्ये मिळाल्याचे सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT
डेमोक्रॅट्सनी जाहीर केलेल्या या फोटोंमध्ये एपस्टीन अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींसोबत विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित असल्याचे दिसत आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, चित्रपट दिग्दर्शक वुडी अॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन, तत्त्वज्ञ नोम चॉम्स्की तसेच माजी ट्रम्प सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे. यापैकी दोन छायाचित्रांमध्ये बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सने दिले स्पष्टीकरण
यामधील एका फोटोत न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक डेव्हिड ब्रूक्सही दिसत आहेत. यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने एक निवेदन जारी करत स्पष्ट केले की, ब्रूक्स यांनी 2011 मध्ये एका जेवणाच्या (पार्टी) कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम त्यांच्या कामासाठी माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने होता. टाइम्सने पुढे असेही सांगितले की, त्या कार्यक्रमापूर्वी किंवा नंतर लेखकाचा (एपस्टीनसोबत) कोणताही संपर्क नव्हता.
या छायाचित्रांच्या प्रकाशनातून कोणत्याही व्यक्तीने गैरकृत्य केल्याचा थेट पुरावा मिळत नाही. समितीने स्पष्ट केले की, या छायाचित्रांपैकी एकाही छायाचित्रात एपस्टीनच्या ओळखीतील व्यक्तींनी केलेल्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचे दर्शन होत नाही. मात्र, या छायाचित्रांमधून एपस्टीनचा प्रभाव आणि संपर्क जाळे स्पष्टपणे दिसून येते, हे डेमोक्रॅट्सनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भातील खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या एका विधेयकानंतर काही दिवसांतच झाला आहे. या विधेयकानुसार न्याय विभागाला शुक्रवारपर्यंत एपस्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेल प्रकरणाशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महिलांच्या शरीरावर मजकूर असलेले फोटो
या फोटोंमध्ये काही अत्यंत धक्कादायक छायाचित्रांचाही समावेश आहे. अनेक छायाचित्रांमध्ये रशियन लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या ‘लोलिटा’ या कादंबरीतील उतारे एका महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले दिसतात. एका धूसर फोटोत महिलेच्या छातीवर ‘लोलिटा’ कादंबरीच्या सुरुवातीच्या ओळी लिहिलेल्या दिसतात. तर, दुसऱ्या एका छायाचित्रात महिलेच्या पायावर कादंबरीतील आणखी एक भाग लिहिलेला असून, पार्श्वभूमीमध्ये ‘लोलिटा’ पुस्तकाची प्रत ठेवलेली दिसते. संभाव्य पीडितांच्या सुरक्षिततेसाठी या छायाचित्रांमधील चेहऱ्यांना ब्लर करण्यात आले आहे.
पासपोर्ट, व्हिसा आणि चॅटिंगचा खुलासा
एपस्टीनकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका आणि लिथुआनिया यांसारख्या अनेक देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रेही आढळून आली आहेत. याशिवाय एका अज्ञात व्यक्तीसोबत झालेल्या टेक्स्ट मेसेजचे स्क्रीनशॉटही समोर आले आहेत. या मेसेजमध्ये मुली पाठवण्याबाबत चर्चा असून, प्रति मुलगी 1,000 डॉलर दराचीही चर्चा आहे. यामध्ये रशियातील एका 18 वर्षीय मुलीचा उल्लेखही करण्यात आला आहे. जप्त केलेल्या सामग्रीमध्ये वास्तुशिल्प आराखडे, फेनाझोपायरीडीन या औषधाची बाटली आणि महिलांची छायाचित्रेही सापडली आहेत.
फाईल्स सार्वजनिक होणार
या छायाचित्रांचा खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या त्या कायद्यानंतर झाला आहे, ज्यामध्ये न्याय विभागाला शुक्रवारपर्यंत एपस्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेलशी संबंधित सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यूही दिसून आले होते. एपस्टीनसोबतच्या संबंधांमुळे प्रिन्स अँड्र्यू यांना याच वर्षाच्या सुरुवातीला शाही पदव्या गमवाव्या लागल्या होत्या. जसजशा नव्या फाईल्स समोर येत आहेत, तसतशी अनेक प्रभावशाली व्यक्तींची अडचण वाढताना दिसत आहे.
कोण होता जेफ्री एपस्टीन?
जेफ्री एपस्टीन हा न्यूयॉर्कमध्ये राहणारा अमेरिकन अब्जाधीश आर्थिक गुंतवणूकदार (फायनान्सर) होता. त्याची अपार संपत्ती आणि जगभरातील मोठे नेते, राजकारणी, उद्योगपती तसेच हॉलीवूडमधील सेलिब्रिटींसोबत असलेली जवळीक यासाठी तो ओळखला जात होता. 2005 मध्ये त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. 2008 मध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याप्रकरणी तो दोषी ठरला आणि त्याला केवळ 13 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
यानंतर 2019 मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या गंभीर आरोपांखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. मात्र, खटला सुरू होण्यापूर्वीच न्यूयॉर्कमधील तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृत अहवालानुसार त्याने आत्महत्या केली होती. दरम्यान, एपस्टीनची दीर्घकाळची साथीदार आणि सहकारी घिस्लेन मॅक्सवेल हिला 2021 मध्ये या गुन्ह्यांमध्ये मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावली असून, ती सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











