मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येचा भाजपमध्ये प्रवेश, पुण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का
Maharashtra Politics : अनेक स्थानिक नेते निवडणूक लढवण्याचा इराद्याने पक्षांतर करताना पाहायला मिळत आहेत. अशातच मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीला मोठा धक्का
Maharashtra Politics : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अनेक स्थानिक नेते निवडणूक लढवण्याचा इराद्याने पक्षांतर करताना पाहायला मिळत आहेत. अशातच मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीये. रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होत्या. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. सायली वांजळे यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केले आहे.
खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 22 माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मुलाने देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय.
आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची खात्री वाटत असल्यामुळे इतर पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. यापूर्वी मोहोळ यांनी इच्छुक नेत्यांना भेटणे टाळले होते; मात्र शुक्रवारी त्यांनी सर्वांना भेटीसाठी वेळ दिल्याने जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात दिवसभर गर्दी पाहायला मिळाली.










