'माणिकराव कोकाटे दोषी, पण...', मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल
Manikrao Kokate: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार माणिकराव कोकटे यांना सत्र न्यायलयाने जी शिक्षा सुनावली त्याला हायकोर्टाने स्थगिती दिली असून जामीन देखील मंजूर केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ज्याविरोधात कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. याच याचिकेवर सुनावणी दरम्यान, कोकाटेंच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ज्यामध्ये त्यांनी कोकाटेंना जामीन मिळावा अशी मागणी केली होती. या युक्तिवादानंतर कोर्टाने या प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे.
सत्र न्यायालायने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलेलं असल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे. पण सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला मात्र हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. म्हणजेच याचा अर्थ कोकाटे यांच्या दोषसिध्दीला स्थगिती नाही फक्त शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.
याशिवाय माणिकराव कोकाटेंसाठी सगळ्यात दिलासा देणारी बाब म्हणजे हायकोर्टाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कोकाटे यांना जामीन मंजूर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर 1991 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 10 टक्के कोट्याअंतर्गत नाशिकमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS/LIG) राखीव असलेले दोन फ्लॅट मिळवल्याचा आरोप आहे. हे साध्य करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे, खोटे उत्पन्न प्रमाणपत्रे आणि रेशन कार्ड वापरल्याचा आरोप आहे.










