रोहित पवारांच्या वडिलांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास दिला नकार

मुंबई तक

• 07:57 AM • 02 May 2022

-वसंत मोरे, बारामती राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधील सुप्त संघर्ष आता सर्वपरिचित झाला आहे. हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. शेती आणि शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत […]

Mumbaitak
follow google news

-वसंत मोरे, बारामती

हे वाचलं का?

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधील सुप्त संघर्ष आता सर्वपरिचित झाला आहे. हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे.

शेती आणि शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कामाबद्दल राजेंद्र पवार यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते आज या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होत असताना राजेंद्र पवारांनी या सोहळ्याला हजेरी लावलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीपेक्षा कार्यालयातल्या शिपायाकडून पुरस्कार स्विकारेन अशी भूमिका राजेंद्र पवार यांनी जाहीर केली आहे.

“दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसात झाले आहेत. ते पध्दतशीरपणे सुरू आहेत. ज्या महान दाम्पत्याने म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे लोक, या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणारे लोक महत्वाच्या पदावर आहेत. गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात नेमकी जी अराजकता निर्माण केली जात आहे, त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल तर मी त्यांच्या हस्ते हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी हा पुरस्कार कृषी कार्यालयात जाऊन तिकडच्या शिपायाच्या हस्ते स्वीकारणे मला योग्य वाटेल”, असेही पवार यांनी म्हटले आहे.

“हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान रयतेचे राजे या राज्यात होऊन गेले. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा आदर्श घालून दिला. अगदी राज्य करताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, उद्या शेतात गोंधळ घालू नका डोलकाठ्या हवे असतील तर रयतेला राजी करून घ्या असे आदेश आणि शेतकऱ्यांची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी आपल्या प्रशासनाला दिले होते. त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे.”

ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या कृषी धोरणाची बिजे रोवली. यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नक्षत्राची लेणी फुलवली आणि महाराष्ट्र शेतीच्या बाबतीत समृद्धीच्या मार्गाने नेला. हे सारे पाहता ज्यांचा आदर्श मिरवतो ते छत्रपती शिवाजी महाराज; ज्यांच्या विचाराने आपण चालतो त्या फुले-शाहू-आंबेडकर आणि हा पुरस्कार ज्या कामासाठी आणि ज्यांच्या नावाने दिला जातो त्याचा विचार करता हा पुरस्कार एखाद्या कृषी कार्यालयात आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारणे योग्य झाले असतं असं राजेंद्र पवारांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp