Uddhav Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नंदनवन या शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली होती. याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन दिली होती. दरम्यान, या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेला वगळून आपल्या पक्षातील स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "...भाऊ पळवला", राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
कोण होणार स्वीकृत नगरसेवक?
ठाकरे गटातर्फे साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र याआधी मनसेकडून यशवंत किल्लेदार यांनी उद्धव सेनेच्या तीन स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून मनसेला एक स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
मनसेच्या अपेक्षांवर पाणी
तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या अपेक्षांवर पाणी सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 28 फेब्रुवारी रोजी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच ही घडमोड घडल्याने मनसे आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
राज ठाकरेंनी का घेतली शिंदेंची भेट?
राज ठाकरे यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याविषयी शिंदेंनी सोशल मीडियात पोस्ट करुन माहिती दिली. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये शिंदेंनी म्हटलंय की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने पाहणी केली, आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला.'
ADVERTISEMENT











