राज्यसभा निवडणूक: ‘आम्ही बरेच प्रयत्न केले, फडणवीसांच्या घरीही गेलो पण…’, राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई तक

• 10:38 AM • 03 Jun 2022

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत कोणीही आपला अर्ज मागे घेतला नाही. महाराष्ट्रातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं नेते हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानीही गेले होते. पण तरीही या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत कोणीही आपला अर्ज मागे घेतला नाही. महाराष्ट्रातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं नेते हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानीही गेले होते. पण तरीही या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

हे वाचलं का?

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लागलीच माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली. घोडेबाजार रोखण्याच मविआने प्रयत्न केला. पण भाजप उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. पण या निवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘आता वेळ सुरु झालेली आहे. आता चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. आपण एकमेकांच्या सहमतीने ही निवडणूक लढवावी. कोणत्याही पद्धतीने घोडेबाजाराला वाव राहू नये यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील’

‘महाविकास आघाडीचे नेते हे आज सकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या घरी जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील असतील. त्यांना त्यांच्या घरी जाऊन नेते भेटले. काही प्रस्तावाचं आदानप्रदान झालं. मला असं वाटतं की दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहे. भाजप त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. आणि शिवसेनेचे जे दुसरे उमेदवार आहेत संजय पवार हे सुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे आता जी काही प्रक्रिया आहे निवडणुकीची त्या प्रक्रियेला सामोरं जाणं आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला खात्री आहे की, आमचा सहावा उमेदवार सुद्धा निवडून येईल.’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

LIVE- राज्यसभेची निवडणूक होणारच, कुणीही प्रस्ताव घ्या कुणी समजून घ्याची वेळ संपली

‘आम्ही निवडणुकीला घाबरतोय असं अजिबात नाही’

‘ही निवडणूक आहे. जर सामोपचाराने काही मार्ग निघाला असता तर दोघांनाही हवं होतं. पण नाही झालं. पण तरीही ही निवडणूक आम्ही जिंकू. कारण ज्याअर्थी आम्ही आमचा उमेदवार रिंगणामध्ये कायम ठेवलेला आहे संजय पवार यांना त्याअर्थी आमची पूर्ण तयारी आहे. असं नाही की, आम्ही निवडणुकीला घाबरतोय. सरकार आहे आमचं या महाराष्ट्रात. जसं केंद्रात तुमचं सरकार आहे तसं महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. सर्व आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा उत्तम समन्वय आहे. मुळात राजकीय पक्षाच्या आमदारांना मत हे दाखवायचं आहे. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. बाकी जी लढाई आहे. ती अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्यासाठी आहे.’ असं म्हणत संजय राऊतांनी आता निवडणुकीसाठी तयारी झाली असल्याचा दावा केला आहे.

‘भाजपकडून फूस लावण्याचे, आमदार फोडण्याचे प्रकार सुरु’

‘गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री आणि सरकारने या सगळ्यांशी उत्तम संवाद ठेवून अनेकांच्या मतदारसंघातील महत्त्वाची कामं केल्यामुळे हे सर्व आमदार महाविकास आघडीबरोबर जोडलेले आहे त. आता यांना फूस लावण्याचे, फोडण्याचे, आमिष दाखविण्याचे किंवा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करण्याचे प्रकार सुरु झाल्याचं आमच्या कानावर आलेलं आहे. पण ठीक आहे. ती त्यांची पद्धत आहे.’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

‘मागे आमदारांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाला, पण…’

‘आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे शिवसेनेचे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार रिंगणात आहेत. मी परत सांगतो आपल्याला निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल.’

‘मागे आमदारांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आणि ते आमदार सोडवून सुद्धा आणलेले होते आपल्याला हे माहित असेल. आता ती वेळ कोणावर येणार नाही. तसा कुणी प्रयत्नही करु नये. लहान पक्ष आणि अपक्ष यांची जी मतं हवी आहेत ती आमच्याकडे आहेत.’

‘आता जी बैठक राज्यसभेसाठी सुरु आहे. तशीच तयारी आम्हाला 20 जुलैच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी देखील करावी लागेल.’ असं म्हणत संजय राऊतांनी पुढील राजकारणाबाबत देखील भाष्य केलं.

‘विरोधी पक्ष राज्यात सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक उद्योग करत असतं. त्याचाच एक भाग म्हणजे निवडणुका लादणं कारण नसताना. जेणेकरुन सरकार त्यात बिझी राहावं. आमदारांमध्ये अस्थिरतता निर्माण व्हावी. खेचाखेची व्हावी. यासाठी निवडणुका लादल्या जातात.’

‘खरं म्हणजे निवडणुका न करताही अशाप्रकारे निर्णय घेता येतात. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा हे झालेलं आहे. पण भाजपने एक नवीन पायंडा पाडला आहे. पण ठीक आहे लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असतं.’ असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

    follow whatsapp