मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात शिंदे सरकार आल्यापासून सातत्याने चर्चेत आहेत. कधी सणासुदीच्या निमित्तानं राजकीय गाठीभेटींमुळे तर भाजप, शिंदेंसोबत युतीच्या चर्चांमुळे तर कधी पत्रांमुळे. अशातच आता राज ठाकरे पुन्हा एकदा एका भेटीमुळे चर्चेत आले आहेत. गोव्याच्या राज ठाकरेंची आणि ओरिजनल राज ठाकरेंची झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. विषेश म्हणजे, या दोघांच्या भेटीमधील दुवा ठरले आहे तो शिंदे फॅक्टर.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्याभोवती केंद्रीत झालं आहे. शिंदे फॅक्टरला धरूनच राजकीय घडामोडी सुरू आहेत. हा फॅक्टर निव्वळ महाराष्ट्रापुरताच नाही, तर शेजारच्या राज्यांतही पोचला आहे.
रिवोल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी बुधवारी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. जानेवारीत स्थापन झालेल्या या पक्षानं अवघ्या एका महिन्यात आपला करिश्मा दाखवला. ४० आमदारांच्या गोवा विधानसभेत एक आमदार निवडून आला. दहा मतदारसंघात प्रत्येकी जवळपास १० हजार मतं मिळवली. भुमिपुत्रांचा अजेंडा घेऊन पहिल्या निवडणुकीतल्या या करिश्म्यामुळे मनोज परब यांना गोव्याचे राज ठाकरे म्हटलं जावू लागलं.
भूमिपुत्रांना न्याय आणि प्रादेशिकतावाद हे दोन दोघांतले समान धागे. हे धागे बुधवारी एकमेकांना मिळाले. मनोज परब यांनी ट्विट करून या भेटीची माहिती दिली. ते लिहितात,
धन्यवाद राज ठाकरे जी, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. गोव्यातील स्थानिकांच्या हक्कांबद्दल आम्ही चर्चा केली आणि भूमिपुत्रांसाठी आमच्या पक्षाच्या कार्याबद्दल राज ठाकरे यांना माहिती दिली. प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत आमच्या बैठका अशाच सुरुच राहणार आहेत. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी गोव्यातील स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काम करत राहील.
दोघांमधला दुवा ठरलेला शिंदे फॅक्टर :
राज ठाकरे-मनोज परब यांच्यासोबत फोटोमध्ये आणखी एक व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीचं नाव मंगेश चिवटे आहे. मंगेश चिवटे यांची सध्याची ओळख सांगायची तर ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजूंना मदत पोचवण्यासाठी काम करतात. याआधी आणि सध्याही चिवटे शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी पार पाडतात. मुख्यमंत्री होण्याआधी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर याच वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून नेटवर्क विस्तारलं. हेच चिवटे मनोज परबांचे मित्र आहेत.
ADVERTISEMENT
