लातूरमध्ये धाडसी दरोडा : २ कोटी २५ लाखाच्या रोकडसह ७३ लाखांचे दागिने लंपास

लातूर (अनिकेत जाधव) : शहरातील कातपूर रोड येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या घरी धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांच्या रोकडसह ७३ लाखांचे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत हा सर्वांत मोठा दरोडा मानला जात आहे. याबाबत […]

Mumbai Tak

मुंबई तक

12 Oct 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:09 AM)

follow google news

लातूर (अनिकेत जाधव) : शहरातील कातपूर रोड येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या घरी धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांच्या रोकडसह ७३ लाखांचे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत हा सर्वांत मोठा दरोडा मानला जात आहे.

हे वाचलं का?

याबाबत फिर्यादीमधून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कातपूर रोडवर कन्हैया नगर येथे आकाश राजकमल अग्रवाल यांचा बंगला आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोर त्यांच्या घरामध्ये घुसले. यावेळी दरोडेखोरांनी आकाश अग्रवाल यांना झोपेतून उठवतं बंदुकीसह धारदार हत्याराचा धाक दाखवला, गळ्याला चाकू लावला. यावेळी घरात त्यांची आई, पत्नी, मुलगा व मुलगी असे पाच जण होते.

दरोडेखोरांनी अग्रवाल कुटुंबाला शस्त्राच्या साह्याने धमकावत त्यांच्याकडून कपाट व लॉकरच्या चाव्यासहित मोबाईलही काढून घेतला. कपाटातून २ कोटी २५ लाखांची रोकड व ७३ लाखांचे सोने असा मुद्देमाल चोरी केला. त्यानंतर आम्ही अजून इथेच आहोत, कसलीही हालचाल करू नका, आरडाओरडा करू नका, कोणाशी संपर्क साधू नका असे धमकावत तेथून पळ काढला.

दरोडेखोरांनी घर सोडताच पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अग्रवाल यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. फिर्यादीमध्ये दरोडेखोर हे २५ ते ३० वयोगटातील होते, मराठी भाषा बोलत होते, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बावकर तपास करत आहेत. तसेच विवेकानंद चौक पोलीस, उपविभागीय पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा संयुक्तपणे काम करत आहेत, अशी माहिती विवेकानंद चौक पोलिसांनी दिली.

    follow whatsapp