स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली
ADVERTISEMENT
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संभाजी भिडे यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यावर तू टिकली किंवा कुंकू लावून ये मग मी तुझ्याशी बोलेन असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. यानंतर आता संभाजी भिडे यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत ते टिपू सुलतानची जयंती साजरी न करण्यासंदर्भात कुंकू न लावलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आहेत. हा फोटो व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर रंगली आहे याच संदर्भातली चर्चा
टिपू सुलतानची जयंती साजरी करणे तत्काळ बंद करावे , या मागणीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांना निवेदन सादर केले. त्यावेळी या महिला अधिकाऱ्यांनीही कुंकू लावले नसतानाही मोठ्या आदराने त्यांच्याशी भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली होती. 4 नोव्हेंबर रोजी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांना भिडे यांनी निवेदन दिलं होतं. प्रत्येक हिंदू महिलेने कपाळावर टिकली लावली पाहिजे , असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे दुजाभाव का केला , याची चर्चा समाजमाध्यमावर सुरू झाली आहे.
२ नोव्हेंबरला काय घडली होती घटना?
साम मराठी या वाहिनीच्या पत्रकार रूपाली बडवे या मंत्रालयात गेल्या होत्या. त्यांनी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते म्हणून त्यांना गुरूजी तुम्ही कुणाची भेट घेतली हा प्रश्न विचारला. त्यावर संभाजी भिडे म्हणाले की तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू/ टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. यावरून बराच वाद झाला होता.
कोण आहेत संभाजी भिडे?
संभाजी भिडे हे सांगलीत राहतात. त्यांचं वय ८० आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असं आहे. त्यांना भिडे गुरूजी किंवा संभाजी भिडे म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्काली प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे हे त्यांचे काका होते. संभाजी भिडे १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.
भीमा कोरेगाव प्रकरणात नाव आलं होतं समोर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था संभाजी भिडे यांनी स्थापन केली आहे. २०१८ मध्ये जेव्हा भीमा कोरेगाव प्रकरण घडलं त्यावेळी संभाजी भिडे यांचं नाव समोर आलं होतं. तसंच त्यांनी आत्तापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा टीकेचे धनीही ठरले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
ADVERTISEMENT
