चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन, तर फडणवीसांना खुलं आव्हान; संजय राऊत ‘त्या’ विधानावर काय म्हणाले?

मुंबई तक

• 05:21 AM • 24 Jul 2022

‘मनावर दगड ठेवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं,’ असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं या विधानाबद्दल अभिनंदन केलं आहे. दुसरीकडे राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे. माध्यमांशी बोलताना खासदार […]

Mumbaitak
follow google news

‘मनावर दगड ठेवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं,’ असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं या विधानाबद्दल अभिनंदन केलं आहे. दुसरीकडे राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे.

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला, सभांना मोठा प्रतिसाद मिळतोय. पैठणमध्ये तर नाथसागरचं रस्त्यावर उसळला असं चित्र होतं. हे चित्र ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्या करून भाजप असेल वा इतर कुणी, त्यांच्या छातीत धडकी भरवणारे आहे.शिवसैनिकांच्या अश्रुंच्या पुरात हे डबल स्टॅण्डर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही,” असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राज ठाकरेंना संजय राऊतांचा टोला

“सरकार पडण्याबद्दल आम्ही भाजप सरकार बोलणार नाही, पण हे सरकार टिकत नाही. हे सरकार बहुमत गमावेल. हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल. हे सरकार मजबूत पायावर उभं नाही. त्यामुळे कुणाला काय पिपाण्या वाजवायच्या असतील, तर त्या वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे, तो तसाच घुमत राहिल. भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे,” असा टोला संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

Raj Thackeray: ”बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे ‘बडवे’ सारखेच, मीही त्याचमुळे बाहेर पडलो”

“आधी सरकार स्थापन करा. एका महिन्यानंतरही हम दोनो, एक दुजे के लिए. किती वेळा दिल्लीला जाणार? ठिक आहे, भाजपचं राज्य आहे. आम्ही शिवसेना आहोत, असं जरी ते म्हणत असले, तरी संभाजीनगर, पैठणला जी दिसली, ती शिवसेना,” असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच का केलं अभिनंदन?

“भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही. तिथे मनमोकळेपणाने आपलं मत व्यक्त करता येत नाही. संपूर्ण देशात ही परिस्थिती आहे, पण भाजपत अजिबातच व्यक्ती स्वातंत्र्य नाही. तरी मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो. भाजपचे सच्चे कार्यकर्ते, तरी त्यांनी थोडं कोल्हापूरचं पाणी दाखवलं. हल्ली त्यांचा कोल्हापुरशी संबंध नाहीये. ते पुण्यात आले आहेत. तरी थोडं कोल्हापूरचं पाणी दाखवलं आणि जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते ओठांवर आलं. नंतर खुलासा करावा लागला की, ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर भाष्य केलं.

खरी शिवसेना कुणाची? ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा! निवडणूक आयोगाचे ठाकरे-शिंदे गटाला निर्देश

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

“आदित्य ठाकरेंचा बुलंद आवाज हा महाराष्ट्राला हवाहवासा वाटणारा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील. प्रत्येक शिवसैनिकाचा आक्रोश, घराघरातील महिलेचा हुंदका हा सुद्धा लाऊडस्पीकर आहे. हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही. मिस्टर फडणवीस, तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. केंद्रीय तपास यंत्रणांची करा. सीबीआय असो वा अन्य इतर कोणतीही कारवाई करा. मला तुमची सगळी कारस्थान मला माहितीये आणि मी तोंड द्यायला तयार आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

    follow whatsapp