हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील; पाटलांच्या ‘त्या’ विधानांवरून राऊतांनी सुनावलं

मुंबई तक

• 02:16 AM • 19 Sep 2021

साकीनाक्यात एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबई हादरली. या प्रकरणातील आरोपी परप्रांतीय असल्याचं समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय लोकांच्या ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यावर ‘परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या याचं विधानावरून राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरण, उत्तर प्रदेश विधानसभा आणि मुंबई महापालिका […]

Mumbaitak
follow google news

साकीनाक्यात एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबई हादरली. या प्रकरणातील आरोपी परप्रांतीय असल्याचं समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय लोकांच्या ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यावर ‘परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या याचं विधानावरून राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

साकीनाका बलात्कार प्रकरण, उत्तर प्रदेश विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष वेधत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवर ‘रोखठोक’मधून टीकेचे बाण डागले आहेत.

‘साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढला. मुंबईत बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवा, असं मुख्यमंत्री पोलिसांना सांगतात व त्याचे राजकीय भांडवल भाजपसारखे पक्ष करतात. हे राजकारण उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी व मुंबई महानगरपालिकेसाठी चालले आहे. एक दिवस हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील!’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.

संजय राऊत म्हणतात… ‘रोखठोक’मधील १३ मुद्दे

‘महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे.’

‘ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱया प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले.’

नक्की परप्रांतीय कोण?

‘परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत. मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठ्या वसाहती आहेत. माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत.’

‘शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो व त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. मुंबई तर बऱ्याच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढ्यानपिढ्या मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?’

‘मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही.’

‘मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाड्या आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. श्रीमंतांना कोणीच परप्रांतीय, उपरे वगैरे मानत नाही. पण पोटासाठी भटकंती करणाऱ्या, मजूर वर्गाला परप्रांतीय म्हणून हिणवले जाते ही शोकांतिका आहे. अंबानी, अदानी, हिरानंदानी, रहेजा, कुकरेजा वगैरेंना कोणी ‘बाहेरचे’ म्हणणार नाही. राजकारण्यांत ते धाडसही नाही.’

‘मुंबईसारख्या शहरातले अनेक उद्योग व उद्योगांची कार्यालये बाहेर गेली. हेसुद्धा मुंबईवर आक्रमण करण्याचे परप्रांतीय उद्योग आहेत, अशी वेदना कोणाला होत नाही. जेट एअरवेज ही विमान कंपनी आता पुन्हा सुरू होत आहे. या कंपनीचे मुख्यालय आधी मुंबईत होते, ते आता दिल्लीजवळच्या गुडगावला नेले. आंदोलन यासाठी व्हायला हवे, पण येथे अनेकांचे इंटरेस्ट गुंतल्याने सगळेच चूप राहतात.’

‘जावेद अख्तर यांनी ‘सामना’त एक लेख लिहिला. हिंदू समाज हा जगातील सगळ्यात सभ्य व सुसंस्कृत असल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केले. या सभ्यपणात महाराष्ट्राचा-मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, पण हिंदुत्वाचे ‘खोमेनीकरण’ व आजचे ‘तालिबानीकरण’ त्यांनी कधीच होऊ दिले नाही. म्हणून मुंबईत स्वतःला परप्रांतीय मानून राहणारे समाज हिंदू म्हणून कायम सुरक्षित राहिले.’

‘महाराष्ट्रात हे असे कधीच घडले नाही. गुजरात, आसाम, तामीळनाडू, कर्नाटकात परप्रांतीयांविरुद्ध आंदोलने अनेकदा झालीच आहेत. बेळगावातील मराठी लोकांना आजही परप्रांतीयच समजले जाते व बेळगावातील निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारेच मुंबईत ‘परप्रांतीय’वादास फोडणी देत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले हे समजून न घेता त्यांचे उधळणे सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढणे हा दळभद्री प्रकार आहे.’

‘देश सगळ्यांचाच आहे, पण कायदा-सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे, असे भारतीय घटना सांगते. आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील, तर घाण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे- ”परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?” मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसते!’

‘शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांवर ‘ईडी’चा ससेमिरा लावता, मग भाजपचे सर्व पुढारी धुतल्या तांदळासारखे आहेत काय? ‘ईडी’ त्यांच्यामागे का लागत नाही? आर्थिक गुन्हे फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचेच लोक करतात काय? हे चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या प्रश्नाचे रोख उत्तर आहे. भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे!.’

    follow whatsapp