Patra Chawl land scam case : मरेन पण शरण जाणार नाही, शिवसेना सोडणार नाही -संजय राऊत

मुंबई तक

• 04:14 AM • 31 Jul 2022

पत्रा चाळ प्रकरणात ईडीकडून शिवसेना खासदार यांची चौकशी सुरू आहे. ईडीचं एक पथक आज संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी दाखल झालं. ईडीचे अधिकारी निवासस्थानी दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भांडुप येथील संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी दाखल झाले. ईडीच्या […]

Mumbaitak
follow google news

पत्रा चाळ प्रकरणात ईडीकडून शिवसेना खासदार यांची चौकशी सुरू आहे. ईडीचं एक पथक आज संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी दाखल झालं. ईडीचे अधिकारी निवासस्थानी दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

हे वाचलं का?

भांडुप येथील संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी दाखल झाले. ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू होण्यापूर्वी संजय राऊत यांनी काही ट्विट्स केले आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

पहिल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केला, ज्यात धनुष्य बाण, वाघ आणि शिवसेना असं लिहिलेलं आहे. त्याबरोबर ‘तरीही शिवसेना सोडणार नाही’, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

Patra Chawl land scam case : ईडीचं पथक खासदार संजय राऊतांच्या घरी

महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असं संजय राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्यानंतर आणखी एक ट्विट संजय राऊत यांनी केलं असून, ‘खोटी कारवाई… खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही… मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र’, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतोय -संजय राऊत

‘कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. शिवसेना झिंदाबाद!!! लढत राहीन’, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?

संजय राऊतांचा आज हिशोब होणार – किरीट सोमय्या

ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे. किरीट सोमय्या म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या लुटमार, भ्रष्टाचार, माफियागिरी, दादागिरी यांचे पुरावे देत होतो. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. महाविकास आघाडीचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे संजय राऊतांचे अत्याचारामध्ये भागीदार झाले होते. आता सगळ्याचा हिशोब देण्याची वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची लुटमार करण्याचा, दादागिरी, माफियागिरी करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार.”

“मी आरोप एकदाही केले नाहीत. मी पुरावे दिले आहेत. संजय राऊतांची १४ कोटींची संपत्ती जप्त झाली आहे, ती आरोपांमुळे नाही तर पुराव्यांमुळे. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकच्या शेजारी राहायला जायला हवं, अशी माझी आहे इच्छा आहे. प्रार्थना आहे. कारवाई सुरू झालेली आहे. संजय राऊत पळापळ करत होते. काही तरी काळंबेरं होतं म्हणून धावपळ सुरू होती. आता हिशोब द्यायला जावं लागणार,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp