सातारा जिल्हा बँक निवडणूक : रांजणे छोटे कार्यकर्ते, बोलवता धनी वेगळा – शशिकांत शिंदेंची टीका

इम्तियाज मुजावर

• 12:34 PM • 23 Nov 2021

राष्ट्रवादीचे विधानपरिषेदेचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेना आमदार व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या पराभवामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणुक चांगलीच गाजली. विशेषकरुन शशिकांत शिंदेंचा झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिल्हारी लागला आहे. केवळ एका मताच्या फरकाने शिंदे पराभूत झाले. या पराभवानंतर ज्या रांजणेंनी शिंदेंना पराभवाचं पाणी पाजलं, त्यांच्या माध्यमातून शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला आहे. ज्ञानदेव […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादीचे विधानपरिषेदेचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेना आमदार व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या पराभवामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणुक चांगलीच गाजली. विशेषकरुन शशिकांत शिंदेंचा झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिल्हारी लागला आहे. केवळ एका मताच्या फरकाने शिंदे पराभूत झाले. या पराभवानंतर ज्या रांजणेंनी शिंदेंना पराभवाचं पाणी पाजलं, त्यांच्या माध्यमातून शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

ज्ञानदेव रांजणे हे छोटे कार्यकर्ते आहेत. त्यांचा ‘बोलविता धनी’ वेगळा आहे. जिल्ह्यात मी राष्ट्रवादी पक्ष वाढवत असल्यानं अनेकांना माझा अडसर आहे हे मला माहीत आहे, असं म्हणत शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रराजेंवर टीका केली आहे. पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावळीची जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच. शिवेंद्रराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं, म्हणजे पुढच्या काळात कोणत्या तालुक्यात पक्ष कसा वाढवायचा हे ठरवता येईल, असा इशाराही शिंदेनी यावेळी दिला.

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे  यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, पक्षाचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यामुळं त्यांना एका मतानं पराभव पत्करावा लागला. त्यामुळं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांना मदत झाली नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शशिकांत शिंदे यांनी मात्र ही सगळी चर्चा फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला, असं शिंदे म्हणाले.

Satara bank Election : भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’

मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार साहेबांना माहीत आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेऊ नये, असं आवाहन शिंदे यांनी केलं. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत माझं नाव निश्चित झालं होतं. मतदारांचा आकडाही मी समोर ठेवला होता. रामराजे निंबाळकर हे देखील बैठकीला होते. त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले, पण ते किती प्रामाणिक होते माहीत नाही. माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान आहे. येत्या काळात ते समोर येईलच, असंही त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp