मुंबईतील भाजीपाला विक्रेता ते 5 वेळा आमदार; असा होता बीडच्या विनायक मेटेंचा संघर्षमय प्रवास

मुंबई तक

• 07:10 AM • 14 Aug 2022

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राज्यातील मराठा समाजाचे महत्वाचे नेते मानले जाणारे विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात निधन झाले. मुंबईला जात असताना पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतायत. विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी शेवट्पर्यंत लढा दिला. सुरुवातीला मराठा महासंघापासून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम […]

Mumbaitak
follow google news

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राज्यातील मराठा समाजाचे महत्वाचे नेते मानले जाणारे विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात निधन झाले. मुंबईला जात असताना पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतायत. विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी शेवट्पर्यंत लढा दिला. सुरुवातीला मराठा महासंघापासून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम संघटनांच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी काम केले.

हे वाचलं का?

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असलेल्या कुटुंबात जन्म

विनायक मेटे यांचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव या छोट्याशा गावात जन्म झाला. तीन भाऊ आणि एक बहीण असे भावंडं. चौघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे विनायक मेटे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. जेमतेम दीड एकर शेती. त्यातून कुटुंबाचं भागत नव्हतं. म्हणून वडील तुकाराम मेटे हे लोकांच्या शेतात शेत मजुरी करायचे. विनायक मेटे यांनी आपचे हायस्कुलपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील विद्याभवन या शाळेत पूर्ण केले.

कामासाठी मुंबई गाठली; भाजीपाला सुद्धा विकला

कुटुंबातील आर्थिक बेताची परिस्थिती पाहता विनायक मेटे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय केला. सुरुवातीला नातेवाईकांकडे राहून त्यांनी मिळेल ते काम केले. जेजे रुग्णलयाच्या भिंती रंगवण्याचे काम त्यांनी केले. नंतर काही वर्ष त्यांनी मुंबईत भाजीपाला देखील विकला. ज्याठिकाणी ते भाजीपाला विकायचे त्यासमोर अखिल भारतीय मराठा महासंघाचं कार्यालय होतं. तेथे त्यांनी शिपाई म्हणून देखील काम केल्याचं त्यांचे पुतण्या प्रदीप मेटे सांगतात.

अखिल भारतीय मराठा महासंघातून चळवळीला सुरुवात

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयासमोर भाजीपाला विकत असताना आणि प्रसंगी कार्यालयात शिपाई म्हणून काम करत असताना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात ते आले. समाजासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. 1986 सालापासून त्यांनी महासंघाच्या कामाला सुरुवात केली. भुसावळ येथे झालेल्या महासंघाच्या कार्यकर्ता शिबिरात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नंतर पुढच्याच वर्षी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. नंतर 1994 साली महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली.

गोपीनाथ मुंडेंनी हेरलं आणि आमदार केलं

या दरम्यान विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी विविध आंदोलने मोर्चे केली. त्यामुळे मराठा समाजाचा आणि बीड जिल्ह्यातील चेहरा म्हणून भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना हेरलं. 1995 साली युतीचं सरकार होतं. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. एक चळवळीतला चेहरा म्हणून मुंडेंनी 1996 साली राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. खऱ्या अर्थाने 1996 सालापासून विनायक मेटे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

सलग पाचवेळा राहिले आमदार

1996 साली पहिल्यांदा आमदार राहिलेले विनायक मेटे हे सलग पाचवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिले. 1996 ते 2022 सलग 25 वर्षांपेक्षा जास्त काळ ते महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सदस्य राहिले. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर. आर पाटील यांचे ते अतिशय जवळचे मानले जायचे. नंतर त्यांनी स्वतःच्या शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमाने भाजपसोबत काम केलं. 2016 साली त्यांच्यावर युती सरकारने अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अंमलबजावणी, देखरेख व समन्व्य समितीचे अध्यक्ष बनवले.

    follow whatsapp