12 आमदारांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून लाळघोटेपणा; किशोरी पेडणेकरांचं कदमांना प्रत्युत्तर

ऋत्विक भालेकर

19 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:46 AM)

मुंबई: एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी कालच्या भाषणात उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेमुळे सर्वत्र वातावरण तापले आहे. रामदास कदमांना शिवसेनेचे नेते प्रत्युत्तर देत आहेत. आता शिवसेनेच्या नेत्या तथा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांचा खरपूस समाचार घेतला आहे. किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? ”रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी कालच्या भाषणात उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेमुळे सर्वत्र वातावरण तापले आहे. रामदास कदमांना शिवसेनेचे नेते प्रत्युत्तर देत आहेत. आता शिवसेनेच्या नेत्या तथा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांचा खरपूस समाचार घेतला आहे.

हे वाचलं का?

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

”रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणालेत ते ऐका, त्यानंतर त्यांच्या वर्तमानकाळ सांगेन. भूतकाळापासूनच पक्ष फोडण्याची यांच्या मनात दुही माजली होती. राणेच म्हणाले की रामदासने मला तोंडावर पाडलं. विरोधी पक्ष आणि त्याची गाडी मिळाली की टूनकण जाऊन उडी मारून बसला. फडणवीस म्हणाले रामदास भाई तुमचा पगार किती आणि बोलता किती? यापूर्वी दोनदा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार होता.” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या ”12 आमदारांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून लाळघोटेपणा करणारा हा नेता. बाळासाहेब जेव्हा ऐकायचे नाही तेव्हा वहिनींकडे जाऊन मस्का मारायचा. हा भाई म्हणण्याच्या पण लायकीचा नाही. बरं झालं घाण गेली. आमच्या महिलांच्या नजरेतून ते उतरले. नालायक निघालात. राक्षसी वृत्ती दाखवली.”

आपले घाण संस्कार दाखवू नका- किशोरी पेडणेकर

”तुम्ही स्वतःच्या मुलाला आमदार केलं. तुम्ही स्वतःच्या बापाचं नाव लावता. आता आम्ही तुमच्या आईला विचारायला जायचं का हे कसं?. तुम्हाला नाही पटलं तर जिथे जायचं तिथे जा पण आपले घाण संस्कार दाखवू नका. आदित्यने लग्न करायचं की नाही हे त्याचे आई-वडील बघून घेतील. तुम्ही त्यावर भाष्य करणारे कोण?” असा तिखट सवाल किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना विचारला आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

”फॉक्सकॉन घेऊन गेले आणि महाराष्ट्राला फक्त पॉपकॉर्न ठेवलं आहे. MOU पर्यंत ठरलेली गोष्ट अचानक असं काय घडतं की कंपनी दुसऱ्या राज्यात जाते. मे महिन्यापासून ते पाच सप्टेंबरपर्यंत यांचे सरकार MOU करायला निघालं होतं. तेव्हा दहा टक्क्याची विषय कसे निघाले नाहीत. मग फिस्कटल कुठं?. सगळे मोठे प्रोजेक्ट इकडे तिकडे जातील महाराष्ट्राच्या हातात पॉपकॉर्न राहतील” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

किशोरी पेडणेकर दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाल्या

”दसरा मेळावा ही आमची परंपरा आहे. ते करण्यासाठी जर सत्तेचा माज दाखवून आमची कोंडी करणार असाल तर उद्धव ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत. महापालिका आयुक्तांना आमचे काही नेते भेटणार होते. वेळ पडली तर कोर्टात जावं लागेल. उद्या उत्स्फूर्त शिवसैनिक शिवतीर्थावर आला तर त्याला कोणीही थांबू शकत नाही. स्टेज असो वा नसो पण तिथे सगळे एकमेकांना भेटतील. उत्स्फूर्त दसरा मेळावा होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी आम्ही घेतोय. म्हणून परवानगी मागतोय” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

    follow whatsapp