NCP : पवारांना साखर सहसंचालकांचा धक्का; १० गावांच्या समावेशाचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई तक

• 10:00 AM • 20 Oct 2022

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनात काम करणारा कारखाना ओळखला जातो. मात्र प्रादेशिक सहसंचालकांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० गावांचा समावेश करण्याचा ठराव फेटाळून लावत संचालक मंडळाला मोठा धक्का दिला आहे. माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्षेत्रात १० […]

Mumbaitak
follow google news

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनात काम करणारा कारखाना ओळखला जातो. मात्र प्रादेशिक सहसंचालकांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० गावांचा समावेश करण्याचा ठराव फेटाळून लावत संचालक मंडळाला मोठा धक्का दिला आहे.

हे वाचलं का?

माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्षेत्रात १० गावे जोडण्याचा निर्णय घेतला होता. अंजनगाव, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, नारोळी, कोळोली, कारखेल, देऊळगाव, काऱ्हाटी, भिलारवाडी, खराडेवाडी, अशी दहा गावं माळेगाव कारखान्याने पत्राद्वारे मागितली होती. पुरुषोत्तम जगताप, दिलीप परकाळे, गोरख चौलंग, सुरेश वळकुंद्रे, अनिल जगताप, संजय पोमण यांनी ही गावे‘माळेगाव’कडे जाऊ द्यावे, अशी भूमिका मांडली.

तर दिलीप पवारांसह चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे अशा काही सभासद आणि संचालकांनी ‘सोमेश्वर’च हवा, अशी भूमिका मांडली. माळेगाव कारखाना जिंकण्यात सव्वाशे मतांचाच फरक आहे. तो वाढविण्यासाठी ही गावे ‘माळेगाव’ला जोडत आहेत, असा आरोप करत या निर्णयाला सभासदांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, संचालक मंडळाने अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णयाला मंजुरी दिली होती.

विरोधकांनी या निर्णयाच्या विरोधात प्रादेशिक सहसंचालकांकडे दाद मागितली. त्यावर प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी संचालक मंडळाचा हा निर्णय फेटाळून लावत दहा गावे घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधी गटाच्या सभासदांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.

    follow whatsapp