MHADA Lottery: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर 120 फ्लॅट्सची विक्री करण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रीसाठी असलेला सर्वात महागडी घरे दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे आहे, ज्यांची किंमत 8 कोटींपेक्षा जास्त आहे, तर घराची कमीत कमी किंमत 31 लाख असणार आहे.
ADVERTISEMENT
म्हाडाच्या माहितीनुसार, कांदिवली, चारकोप, शिंपोली, अँटॉप हिल, वडाळा, पवई, मालाड, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन, जुहू आणि अंधेरी या भागात फ्लॅट उपलब्ध आहेत. तसेच, FCFS योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले फ्लॅट्स पूर्वी लॉटरीद्वारे देण्यात आले होते परंतु काही कारणांमुळे ते विकले गेले नाहीत आणि आता तेच फ्लॅट्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
कधीपासून कराल अर्ज?
म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून यासाठी इच्छुक नागरिक https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे अर्ज करू शकतात आणि या संधीचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना /घर निश्चिती करणं या प्रक्रियेला 12 फेब्रुवारीच्या सकाळी 11 पासून सुरुवात होणार आहे. म्हाडाच्या मते, अर्जाच्या तारखेला, अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणं आवश्यक आहे आणि तो भारतीय नागरिक असणं अनिवार्य आहे.
अविवाहितांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डचा समावेश आहे, तर विवाहित अर्जदारांसाठी पती-पत्नी दोघांचेही आधार आणि पॅन कार्ड यांचा समावेश आहे. तसेच, घटस्फोटित अर्जदारांना न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत किंवा दाखल केलेल्या अपीलाची प्रत सादर करावी लागेल (अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय फ्लॅटचा ताबा दिला जाणार नाही). डिक्री (decree) प्रमाणपत्राशिवाय फ्लॅटची विक्री केली जाणार नसल्याचं म्हाडाच्या निवेदनात म्हटलं आहे.
कसा कराल अप्लाय?
म्हाडाच्या माहितीनुसार, सिक्योरिटी डिपोझिट भरल्यानंतर अर्जदारांना 'Book My Home' पर्याय मिळेल, ज्यामध्ये विंग किंवा बिल्डिंग नंबर, फ्लॅट नंबर आणि मजला (फ्लोर) यासारखे तपशील दिसतील. जर फ्लॅट उपलब्ध असेल, तर अर्जदार ते निवडू शकतात आणि तो फ्लॅट फायनल केल्यानंतर, 48 तासांच्या आत विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागेल. हे पेमेंट मिळाल्यानंतर, म्हाडा उर्वरित रकमेच्या पेमेंटसाठी तात्पुरते ऑनलाइन ऑफर लेटर जारी करेल. जर अर्जदाराने फ्लॅट निवडल्यानंतर 48 तासांच्या आत विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरली नाही, तर फ्लॅटवरील दावा आपोआप रद्द होईल आणि संपूर्ण सिक्योरिटी डिपोझिट रक्कम जप्त केली जाणार असल्याचं म्हाडाने स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी नोकरी हवीये? मग, 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! 'इंडियन ऑइल'मध्ये भरती...
याशिवाय, जर तात्पुरतं ऑफर लेटर जारी केल्यानंतर, अर्जदाराने कोणत्याही कारणास्तव फ्लॅट रद्द केला, विहित वेळेत विक्री किंमत भरली नाही किंवा कोणत्याही कारणास्तव वाटप रद्द केलं तर, फ्लॅटच्या विक्री किमतीच्या 1 टक्के रक्कम भरलेल्या रकमेतून वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम कोणत्याही व्याजाशिवाय परत केली जाईल.
म्हाडाने प्रॉपर्टी एजंट नियुक्त केलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही. अर्जदारास कोणी दलाल/ व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/ प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा.
ADVERTISEMENT











