श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत. आफताब पूनावालाने ज्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या करुन तुकडे केले. त्याच ठिकाणी पोलिसांना पाच चाकू मिळालेत. तर दुसरीकडे फरिदाबादमध्ये काही मृतदेहाचे तुकडे सापडले असून, ते तुकडे श्रद्धाचे आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.
ADVERTISEMENT
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाने हत्येची कबुली दिली असली, तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिसांनी आफताबची पॉलिग्राफ चाचणीही केली असून, आता पोलिसांच्या हाती आफताबच्या घरातून काही पुरावे हाती लागलेत.
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक धारदार शस्त्रांचा वापर?
आरोपी आफताब पूनावालाने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्याने श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. आता आफताबने अशी कबुली दिलीये की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने एकापेक्षा अधिक शस्त्राचा वापर केलाय. पोलिसांनी आफताबच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर 5 चाकू सापडले आहेत.
आफताबच्या फ्लॅटमध्ये सापडलेले चाकू हे घरात वापरले जाणारे नसून, त्यांची लांबी 5 ते 6 इंच इतकी आहे. पोलिसांनी हे चाकू जप्त करून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या तपासणीतून या चाकूचा वापर मृतदेह कापण्यासाठी झालाय की नाही हे समोर येणार आहे.
श्रद्धा वालकर हत्या : पोलीस घेताहेत आरीचा शोध
सुरूवातीच्या चौकशीत आफताब पूनावालाने पोलिसांना सांगितलं होतं की, त्याने श्रद्धाच्या हत्येसाठी आरी आणि ब्लेडचा वापर केला. आरी आणि ब्लेड गुरुग्राममधील डीएलएफ फेज 3 मधील झाडांमध्ये फेकले होते. दिल्ली पोलिसांनी दोन वेळा गुरूग्राम मधील त्या ठिकाणाची पाहणी केलीये. पोलिसांना काही वस्तू सापडलेल्या असून, त्या तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत.
श्रद्धा वालकर हत्याकांड : फरिदाबादमध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण समोर आल्यापासून दिल्ली पोलीस सातत्यानं पुरावे शोधत आहेत. दिल्ली पोलिसांनी मेहरौलीच्या जंगलाचा कानाकोपरा छानून काढला आहे. पोलिसांना आतापर्यंत 16 तुकडे मिळाले असून, ते श्रद्धाचे आहेत का हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेत.
त्यातच आता फरिदाबादमधील अरावली हिल्स जवळ रोडवर पडलेल्या ट्रॉली बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतलीये. मृतदेहाचे हे तुकडे श्रद्धाचे तर नाहीत ना, या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरू केलाय. मेहरौली पोलिसांनी हे तुकडे असण्याची शक्यता फेटाळली आहे.
श्रद्धा वालकर प्रकरण : पोलिसांसमोर अजूनही मोठं आव्हान
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाविरुद्ध पोलीस पुरावे शोधत असले, तरी अजूनही काही महत्त्वाचे पुरावे मिळालेले नाहीत. श्रद्धाच्या मृतदेहाचे पूर्ण तुकडे पोलिसांना अजून मिळालेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. ज्या आरीने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, ती आरीही पोलिसांना अजून सापडलेली नाही. हत्या करण्यात आली, त्यावेळी श्रद्धाच्या अंगावर असलेले कपडे आणि श्रद्धाचा मोबाईल, हे अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही. त्यामुळे पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे.
ADVERTISEMENT











