” ….तर आज श्रद्धा जिवंत असती ” हत्या झालेल्या मुलीच्या आठवणीत वडील ढसाढसा रडले

मुंबई तक

14 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

पालघरची श्रद्धा वॉकर आणि आफताब अमीन पूनावाला हे दोघंही पालघरमधले रहिवासी. श्रद्धाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आफताबला अटक केली आहे. जर श्रद्धाने आमचं ऐकलं असतं तर ती आज जिवंत असती असं म्हणत तिचे वडील ढसाढसा रडले आहेत. काय म्हणाले श्रद्धाचे वडील? आफताब पूनावाला […]

Mumbaitak
follow google news

पालघरची श्रद्धा वॉकर आणि आफताब अमीन पूनावाला हे दोघंही पालघरमधले रहिवासी. श्रद्धाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आफताबला अटक केली आहे. जर श्रद्धाने आमचं ऐकलं असतं तर ती आज जिवंत असती असं म्हणत तिचे वडील ढसाढसा रडले आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले श्रद्धाचे वडील?

आफताब पूनावाला आणि श्रद्धाच्या अफेअरबाबत आम्हाला १८ महिन्यांपूर्वी कळलं होतं अशी माहिती तिचे वडील विकास वॉकर यांनी दिली. मुलीने २०१९ मध्ये तिच्या आईला आपण आफताबसोबत लिव्ह इनमध्ये राहात असल्याचं सांगितलं. आम्ही दोघांनीही तिला विरोध केला. त्यावर ती म्हणाली की मी आता २५ वर्षांची झाली आहे मला माझे निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचं आहे तुमच्यासोबत नाही. असं म्हणत तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिला अडवलं पण तिने ऐकलं नाही.

मुलीने घर सोडल्यावर आम्हाला कळलं की ती वसईत आहे

मुलीने घर सोडल्यावर आम्हाला कळलं की ती वसईमध्ये राहते आहे. श्रद्धा कधी कधी तिच्या आईसोबत फोनवरून बोलत असे. आफताब तिला मारहाण करत होता असं तिने तेव्हा सांगितलं होतं. मधल्या काळात श्रद्धाची आई वारली. त्यानंतर तिने मला एक दोनदा फोन केला होता. तिने आफताब मारहाण करतो हे सांगितलं. मी तिला आफताबला सोडून ये सांगितलं. मात्र दरवेळी आफताब समजवायचा आणि ती थांबायची तिने ऐकलं असतं तर ती वाचली असती असं तिच्या वडिलांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

श्रद्धा वॉकर हत्या प्रकरण : काय घडलं?

श्रद्धा वॉकरचे वडील विकास मदान यांनी सांगितलं की, ते कुटुंबासह पालघर येथे राहतात. श्रद्धा वॉकर मुंबईतल्या मालाड भागात बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिथे आफताबच्या प्रेमात पडल्यानंतर दोघे लिव्ह-इन मध्ये राहू लागले.

श्रद्धा वॉकरच्या प्रेमसंबंधाबद्दल तिच्या कुटुंबियांना कळलं. त्यानंतर कुटुंबियांनी याला विरोध केला. कुटुंबियाचा विरोध झुगारून श्रद्धा मुंबई सोडून आफताबसोबत दिल्लीला निघून गेली.

श्रद्धा वॉकरच्या खुनाचा उलगडा कसा झाला?

श्रद्धा वॉकर दिल्लीत गेल्यानंतर तिच्या कुटुंबियाचा तिच्याशी संपर्क होत होता. ती महरौली भागातील छतरपूर परिसरात राहत होती. विकास वॉकर सांगतात, श्रद्धाबद्दल माहिती मिळत राहायची, पण मे नंतर माहिती मिळणं बंद झालं. कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण लागला नाही.

विकास वॉकर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर ते जिथे श्रद्धा वॉकर राहायची त्या फ्लॅटवर गेले. त्या फ्लॅटला कुलूप लावलेलं होतं. त्यांनी थेट महरौली पोलीस ठाणे गाठलं आणि मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करून घेतला.

पोलिसांनी तपास करत अखेर शनिवारी आफताब अमीन पूनावालाला शोधून काढलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीतून आफताबने केलेले खुलासे ऐकून पोलीसही हादरले.

आफताब अमीन पूनावालाने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्यामध्ये लग्नावरून वाद होत होते. श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे १८ मे रोजी त्याने श्रद्धाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात ते फेकले. सध्या आफताब पोलीस कोठडीत असून, पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

    follow whatsapp