मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीला भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेत्यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. आज (31 जानेवारी) दुपारी लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर तातडीने खाते वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग, क्रीडा व युवक कल्याण विभाग आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग सोपवण्यात आले आहेत. हे सर्व विभाग मूळतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच होते. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर हे विभाग सुनेत्रा पवारांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
पण या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवारांकडे असलेले अर्थ खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास स्वत:कडेच ठेवले आहे. हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेमक्या कोणत्या नेत्याकडे जाईल, याबाबतची चर्चा आता तापली आहे. मार्च महिन्यातील राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे पद तात्पुरते स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
शपथविधीनंतर तातडीने खाते वाटप
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या काही वेळात महायुती सरकारने खाते वाटपाची घोषणा केली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिल्यानंतर काही वेळात खाते वाटप जाहीर करण्यात आले. सुनेत्रा पवार यांना उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ हे विभाग देण्यात आले. हे विभाग अजित पवारांच्या काळातही त्यांच्याकडेच होते. उत्पादन शुल्क विभागातून मिळणारा महसूल राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असतो, तर क्रीडा व युवक कल्याण विभाग युवकांच्या विकासासाठी विविध योजना राबवतो. अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असतो.
हे ही वाचा>> 'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश.. बारामतीलाच का थांबले पार्थ पवार?
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अर्थ, नियोजन, उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात या विभागांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या, ज्यात लाडकी बहीण योजना, शेतकरी कल्याण, युवक विकास आणि महसूल वाढीचे उपक्रम समाविष्ट होते. आता सुनेत्रा पवार या विभागांच्या जबाबदारी सांभाळतील, ज्यामुळे पवार कुटुंबाचा वारसा पुढे चालू राहणार आहे. मात्र, अर्थ खाते न मिळाल्याने सुनेत्रा पवारांच्या भूमिकेला मर्यादा पडू शकतात, असा मतप्रवाह आहे.
अर्थ खाते फडणवीसांकडे - तात्पुरते की कायम?
अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खाते तात्पुरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. फडणवीसांकडे आधीच गृह खाते आहे, आणि आता अर्थ खाते जोडले गेल्याने त्यांची सरकारमधील स्थिती अधिक मजबूत झाली आहे. मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने हे खाते तात्पुरते फडणवीसांकडे ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातूनच दिले जाईल, असा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन अर्थ खाते पक्षाकडेच ठेवण्याची मागणी केली असल्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा>> अजितदादा आणि सुनेत्रा पवार दोघांनी 'एकाच' पदासाठी रचलाय भन्नाट रेकॉर्ड!
अर्थ खाते हे राज्याच्या आर्थिक धोरणांचे केंद्र असते. अजित पवारांनी या खात्यातून 11 अर्थसंकल्प सादर केले होते. आता हे खाते राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याकडे जाईल, याबाबत चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ किंवा आदिती तटकरे यांसारख्या नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी यापूर्वीही महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
अर्थ खात्याचे वाटप हे महायुती सरकारच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे ठरेल. राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची मागणी लक्षात घेता, लवकरच हे खाते पक्षाच्या नेत्याकडे सोपवले जाईल, अशी शक्यता आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष कसा एकजूट राहतो आणि अर्थ खात्याबाबतचा निर्णय कसा घेतला जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ADVERTISEMENT











