होमवर्क केलं नाही म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांचा मार; जागेवरच सोडला प्राण

मुंबई तक

• 07:15 AM • 21 Oct 2021

विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या शिक्षेवर आता बरीच बंधन आणण्यात आली आहेत. असं असलं तरीही काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अमानुषपणे शिक्षा केल्याचे प्रकार अधूनमधून समोर येतात. अशीच एक घटना समोर आली असून, शिक्षकाने केलेल्या लाथाबुक्क्यांच्या बेदम मारामुळे विद्यार्थ्यांला जीव गमवावा लागला आहे. राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील कोलासर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या […]

Mumbaitak
follow google news

विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या शिक्षेवर आता बरीच बंधन आणण्यात आली आहेत. असं असलं तरीही काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अमानुषपणे शिक्षा केल्याचे प्रकार अधूनमधून समोर येतात. अशीच एक घटना समोर आली असून, शिक्षकाने केलेल्या लाथाबुक्क्यांच्या बेदम मारामुळे विद्यार्थ्यांला जीव गमवावा लागला आहे.

हे वाचलं का?

राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील कोलासर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने लाथा बुक्क्यांनी इतकं मारलं की त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

सालासर पोलीस ठाण्याचे प्रमुख संदीप बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोलासर येथील ओमप्रकाश यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा गणेश कोलासर येथील मॉर्डन पब्लिक स्कूल या खासगी शाळेत शिक्षण घेत होता. मागील दोन-तीन महिन्यांपासून तो शाळेत जात होता.

गणेशने मागील १५ दिवसांत वडिलांकडे शिक्षकांबद्दल तक्रार केली होती. मनोज नावाचे शिक्षक आपल्याला विनाकारण मारत असतात, असं गणेशने वडिलांना सांगितलं होतं. दरम्यान, बुधवारी गणेश शाळेत गेलेला होता.

सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गणेशचे वडील ओमप्रकाश यांना शिक्षक मनोज यांनी फोन केला. तुमचा मुलगा आजही होमवर्क न करताच आला होता. त्यामुळे त्याला मारलं. नंतर तो बेशुद्ध पडला, असं शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वडिलांना सांगितलं.

शेतकामात गुंतलेल्या ओमप्रकाश यांनी शिक्षकाला बेशुद्ध झाला आहे की मृत्यू झालाय? अशी विचारणा केली. त्यावर आरोपी शिक्षकाने तुमचा मुलगा मेल्याचं नाटक करतोय असं उत्तर दिलं. त्यानंतर काही वेळाने ओमप्रकाश हे शाळेत पोहोचले. तिथे त्यांची पत्नी आधीपासूनच पोहोचली होती, तर शाळेतील विद्यार्थी घाबरलेले होते.

शाळेत काय घडलं?

वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाने गणेश सोबत काय केलं याबद्दलची सगळी हकिकत सांगितली. आरोपी शिक्षकाने गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला जमिनीवरही आपटलं. त्यामुळे गणेश बेशुद्ध झाला. त्यानंतर कुटुंबियांनी गणेशला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी गणेशचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

याप्रकरणी मयत गणेशचे वडील ओमप्रकाश यांच्या तक्रारीवरून शिक्षक मनोज कुमार विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे, अशी माहिती संदीप बिश्नोई यांनी दिली.

    follow whatsapp