राज ठाकरेंच्या ‘उत्तर’सभेचा मार्ग मोकळा, ठाणे पोलिसांनी दिली परवानगी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिल रोजी ठाणे येथे होणाऱ्या सभेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वात आधी राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवर होणार होती. परंतू ठाणे पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आता राज यांच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:01 AM • 07 Apr 2022

follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिल रोजी ठाणे येथे होणाऱ्या सभेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वात आधी राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवर होणार होती. परंतू ठाणे पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आता राज यांच्या सभेची जागा डॉ. मुस रोडवरुन राम मारुती चौकातील गजानन महाराज चौकात होणार आहे.

हे वाचलं का?

ठाणे पोलिसांनी या जागेला सभेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ९ तारखेला राज ठाकरेंची तोफ धडाडताना संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. डॉ. मुस रोडवर रहदारी आणि वाहतुकीचा खोळंबा होईल म्हणून ठाणे पोलिसांनी राज यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. परंतू मनसे नेते याच ठिकाणी सभा घेण्यावर ठाम होते. बुधवारी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, स्थानिक नेते अभिजीत पानसे यांनी मुस रोडवरील सभेच्या जागेची पाहणीही केली.

परंतू पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीआधी मनसे नेते डॉ. मुस रोडवर सभा घेण्यासाठी ठाम होते. पोलिसांनी परवानगी नाकारली तर राज ठाकरे टेबलवर उभे राहून भाषण करतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले. परंतू या जागेला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर अखेरीस मनसे नेत्यांनी गजानन महाराज चौकातील जागेसाठी समहती दर्शवली आहे.

‘राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत, कारण भाजप..’, रोहित पवारांनी दिला मनसे अध्यक्षांना सल्ला

गुढीपाडव्याच्या सभेत शिवाजी पार्कच्या मैदानावर बोलत असताना राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. तसेच मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा राज यांनी आपल्या भाषणात उचलून धरल्यामुळे त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातील अनेक भागांत पहायला मिळत आहेत. राज यांच्या या भूमिकेवरुन भाजपव्यतिरीक्त अन्य पक्ष त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे या टीकेला राज ठाकरे ९ एप्रिलला काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp