कल्याण: महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवरती विजय मिळवण्यासाठी भाजपनं मायक्रो प्लॅनिंग केलं आहे. राज्यातील १६ मतदार संघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येणार आहेत. मग यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (दोन्ही गट) असे दोन्ही पक्षांचे मतदार संघ लक्ष करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगानं आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण-डोंबीवलीच्या दौऱ्यावर आहेत. या मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. राज्यात युती असतानाही भाजपचा शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर डोळा आहे.
ADVERTISEMENT
असा आहे अनुराग ठाकूर यांचा दौरा.
अनुराग ठाकूर यांचा आज दिवसभर मॅरेथॉन दौरा आहे. सकाळी ९ वाजता सुरु होणारा दौरा रात्री १० वाजत संपणार आहे. या दौऱ्यादरम्यान ठाकूर कार्यकर्ता बैठक ते विविध सांस्कृतीक ठिकाणी भेटी देणार आहेत. सकाळी १० वाजता लोकसभा कोअर कमिटीची बैठक आहे. याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे कारण अनुराग ठाकूर काय सूचना देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यानंतर सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्षांच्या बैठका होणार आहेत. सायंकाळी ठाकूर सर्व माध्यमांना विशेष मुलाखती देणार आहेत.
१६ मतदार संघामध्ये भाजपचं लक्ष
भाजपनं राज्यात १६ मतदार संघ निवडले आहेत ज्यामध्ये आगामी निवडणुकीत भाजपला विजय मिळवायचा आहे. यामध्ये बारामती, सातारा, कल्याण-डोंबीवली, बुलढाणा, शिरुर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा मतदार संघांच्या समावेश आहे. विशेष म्हणजे मिशन ४५ अंतर्गत टार्गेट केलेल्या अनेक मतदार संघांमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत.
निर्मला सितारामन यांच्या खांद्यावर बारामतीची जबाबदारी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी त्या बारामती दौऱ्यावर आहे. सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी भाजपनं विशेष रणनिती आखली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच बारामती दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी काही झालं तरी बारामती जिंकायचीच असा निर्धार केला आहे. त्याचबरोबर आमदार राम शिंदे यांनी सुप्रिया सुळेंना दुसरा मतदार संघ निवडण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
