Arun Gawli daughter Geeta Gawli Yogita Gawli networth assets : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रांमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखले जाणाऱ्या अरुण गवळीच्या दोन्ही मुलींच्या संपत्तीची माहिती चर्चेचा विषय ठरली आहे. गीता आणि योगिता गवळी या दोघी बहिणी अखिल भारतीय सेना पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार त्यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
अरुण गवळीच्या दोन्ही कन्या कोणत्या वार्डातून लढणार?
अखिल भारतीय सेना पक्षाकडून गीता गवळी (वय 42) यांनी प्रभाग क्रमांक 212 मधून तर त्यांची धाकटी बहीण योगिता गवळी (वय 37) यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे दोन्ही प्रभाग भायखळा विभागात येतात. अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे गवळी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : तुळजापूर: आईचे काकासोबत अनैतिक संबंध; वडिलांना सांगणं जीवावर बेतलं, संतापलेल्या काकाने पुतण्यालाच संपवलं
गवळीच्या दोन्ही मुलींच्या संपत्तीचे अन् शिक्षणाचे डिटेल्स
गीता गवळी यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे 7 कोटी 26 लाख रुपये इतकी असल्याचे नमूद केले आहे. या मालमत्तेत त्यांच्याकडे असलेले सुमारे 1,000 ग्रॅम वजनाचे सोने-चांदीचे दागिने समाविष्ट आहेत. याशिवाय त्यांच्या पतीकडे 500 ग्रॅम दागिने असल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. वाहनांच्या बाबतीत, गीता यांच्या नावावर 30 लाख रुपये किमतीची मर्सिडिस बेंझ कारसह महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
विशेष म्हणजे, 2019 साली गीता गवळी यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सुमारे 3 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत, गीता गवळी या एसएससी उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. तर त्यांची धाकटी बहीण योगिता गवळी यांनी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
योगिता गवळी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे 3 कोटी 65 लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या मालकीचे सुमारे 750 ग्रॅम दागिने असल्याची नोंद आहे. तसेच त्यांच्या पतीच्या नावावर एक बीएमडब्ल्यू कार असून, त्यांच्या पतीकडे 250 ग्रॅम दागिने असल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या पार्श्वभूमीबरोबरच त्यांच्या आर्थिक स्थितीकडेही नागरिकांचे लक्ष लागले असून, गवळी कुटुंबातील दोन्ही बहिणींच्या संपत्तीची माहिती आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











