FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर कासिफ खान आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत हे दोघेही एकमेकांना दहा वर्षांपासून ओळखतात म्हणूनच त्याने पार्टी आयोजित करूनही त्याला अटक झाली नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी ट्विट केला व्हीडिओ
‘कासीफ खान कोण आहे, याचा जरा शोध घ्या. तो फॅशन टीव्हीचा भारतातील प्रमुख आहे. त्याचं सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट, पॉर्नोग्राफी ही सगळी कामं तो करतो. त्या दिवशी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 1300 लोकांचा तपास झाला नाही. रेव्ह पार्टी होणार याची माहिती एक महिना आधीपासून होती. रेव्ह पार्टीचा आयोजक ज्याची पार्श्वभूमी ड्रग्ज व्यापाराशी संबंधित आहे याचा तपास होत नाही. क्रूझवर झाडाझडती होत नाही. त्यांना ताब्यात घेतलं जात नाही. म्हणजेच त्यांचे सबंध आहेत’, असा आरोप मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला.
कासिफ खान हा एफ टीव्हीचा इंडिया हेड असला तरीही तो सेक्स रॅकेट चालवतो. ड्रग्जची तस्करी करतो असेही गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. एवढंच नाही तर आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी हे देखील सांगितलं की अशी सगळी पार्श्वभूमी असलेल्या कासिफ खानचे आणि समीर वानखेडेंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच त्याने ही पार्टी आयोजित करूनही त्याला अटक झाली नाही. आता नवाब मलिक यांच्या या नव्या आरोपांना एनसीबी किंवा समीर वानखेडे काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पोपट पिंजऱ्यात बंद होणार असल्यानंच भाजपवाले घाबरलेत -नवाब मलिक
आगामी काळात भाजपचे कुठले नेते एनसीबीच्या कार्यालयात जात होते? समीर वानखेडे यांनी कुणाच्या सांगण्यावरून कारवाई केली आणि के. पी. गोसावीसोबत कोणत्या भाजपच्या नेत्याच्या पत्नीची पार्टनरशिप एका कंपनीत आहे ते सगळं सांगणार आहे. माझ्या जावयाचं नाव घेऊन मला बदनाम करून पाहणाऱ्या भाजप नेत्यांना राज्यात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आता नवाब मलिक हे आरोप नेमके कुणावर आणि काय पुराव्यांसहीत करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आणखी काय म्हणाले नवाब मलिक?
‘भाजपकडून हा कट केला जात आहे. महाराष्ट्रातील सरकार, महाराष्ट्रातील लोक आणि मुंबईतील बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. योगी महाराज नोएडात फिल्मसिटी बनवू इच्छितात. ताज हॉटेलमध्ये येऊन ते लोकांना भेटले. भाजपचे जे समर्थक आहेत, ते त्यांना भेटले होते. बॉलिवूडला बदनाम केल्यानं बॉलिवूड मुंबईतून बाहेर जाईल, असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की, बॉलिवूड बनवायला दादासाहेब फाळके, व्ही. शांतारामपासून ते अनेक मराठी कलाकारांनी काम केलं. त्यांनी ओळख मिळवून दिली. बॉम्बे नाव असल्यानं त्याचं नाव बॉलिवूड असं करण्यात आलं. बॉलिवूड देशाची संस्कृती जगभरात घेऊन जातं. योगींना यूपीवूड तयार होईल असं वाटतं असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे’, असं मलिक म्हणाले.
ADVERTISEMENT
